ऐन रामनवमीच्या दिवशीच मुंबईकरांच्या प्रवासाचा खोळंबा होणार आहे. रविवारी मुंबई लोकलच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. लोकलचे वेळापत्रक कसे असेल, हे जाणून घेऊयात.
मध्य रेल्वेच्या माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत सुमारे चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ब्लॉक कालावधीत या स्थानकांदरम्यान धीम्या गाड्या जलद मार्गावर वळविल्या जातील. त्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. तसेच विद्याविहार, कांजूर मार्ग आणि नाहूर या स्थानकांवर लोकल सेवा उपलब्ध नसणार आहे.
नेरळ स्थानक येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी रविवारी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 8.30 ते दुपारी 2.30 या वेळेत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. काही लोकल अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ब्लॉकमुळे बदलापूर – कर्जत स्थानकांदरम्यानची लोकल सेवा सकाळी 11.30 ते दुपारी 2.30 पर्यंत रद्द असणार आहे.
हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी /नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान
अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे ठाणे आणि वाशी/नेरुळ/पनवेल दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहणार असल्याने प्रवाशांचा खोळंबा होणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या बोरिवली आणि राम मंदिर स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर, तसेच डाऊन जलद मार्गावर 4 तासांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवारी रात्री 12.15 ते रविवारी पहाटे 4.15 या कालावधीत असणार आहे. या कालावधीत बोरीवली आणि अंधेरी दरम्यान अप धीम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत. या कालावधीत राम मंदिर स्टेशनवर प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याने कोणत्याही सेवा उपलब्ध नसणार आहेत. तसेच काही अप आणि डाऊन सेवा रद्द करण्यात येणार आहेत.
अंबरनाथ ते कर्जत लोकल सेवा शनिवारी रद्द
मध्य रेल्वेवरील कल्याण – बदलापूरदरम्यानच्या पुलाच्या पायाभूत कामासाठी शनिवारी रात्रकालीन विशेष वाहतूक ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अंबरनाथ – कर्जत लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. तसेच ब्लाॅक कालावधीत लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांना काही काळ थांबावे लागणार आहे.
– अंबरनाथ – कर्जत स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध नाही
– परळ येथून रात्री ११.१३ वाजता परळ – अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यात येईल.
– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ११.५१ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बदलापूर लोकल अंबरनाथ येथे अंशतः रद्द करण्यात येईल.
– छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.१२ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कर्जत लोकल अंबरनाथ येथे अंशतः रद्द करण्यात येईल.
– कर्जत येथून रात्री २.३० वाजता सुटणारी कर्जत – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल अंबरनाथ येथून अंशतः रद्द करण्यात येईल. आणि अंबरनाथ येथून रात्री ३.१० वाजता सुटेल.
– कर्जत- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष लोकल कर्जत येथून पहाटे ४.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ६.०८ वाजता पोहोचेल.
