Search
Close this search box.

‘राज ठाकरेंच्या अटकेसाठी कोर्टात जाणार’, ‘टू द पॉईंट’ मुलाखतीत गुणरत्न सदावर्तेंची मागणी!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज ठाकरे विरुद्ध गुणरत्न सदावर्ते असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या मराठी सक्तीच्या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार आहेत. टू द पॉईंट मुलाखतीत त्यांनी ही मागणी केलीय. राज ठाकरे हे चिथावणी देत असून त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. सरकारनं राज ठाकरेंना थांबवलं नाही तर आपण राज ठाकरेंच्या अटकेसाठी कोर्टात जाणार असल्याचं सदावर्तेंनी सांगितलंय.

मनसेच्या मराठी सक्तीच्या आंदोलनावरुन गुणरत्न सदावर्ते विरुद्ध राज ठाकरे असा संघर्ष निर्माण झालाय. राज ठाकरे मराठीची सक्ती करुन कायदा हातात घेत असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केलाय. मनसेकडून कुठलीही तोडफोड केली जाऊ नये किंवा कुणालाही मारहाण होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सदावर्तेंनी सांगितलंय.  या विशेष मुलाखतीत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय. राज ठाकरेंच्या आंदोलनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं गुणरत्न सदावर्तेंनी केलाय.

राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी गुणरत्न सदावर्तेंनी केलीय. यासंदर्भात आपण पोलीस आयुक्तांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. शिवाय त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. राज ठाकरे मराठी तरुणांना चिथावणी देत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. राज ठाकरेंच्या आंदोलनामुळं भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळं राज ठाकरेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी सदावर्तेंनी केलीय.

गुणरत्न सदावर्तेंनी मनसेच्या भूमिकेला केलेल्या विरोधाला फार किंमत देत नसल्याचं मनसे नेत्यांनी सांगितलंय. राज ठाकरे ज्या ज्या वेळी एखादी भूमिका घेतात त्या त्या वेळी गुणरत्न सदावर्ते त्या भूमिकेला विरोध करतात. आता मराठी सक्तीच्या मुद्याला गुणरत्न सदावर्तेंनी विरोध केलाय. सदावर्ते आणि मनसेतला या संघर्षाला येत्या काळात वेगळं वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान आज सकाळी राज ठाकरे यांनी आंदोलन तुर्तास थांबवण्याचे आदेश मनसैनिकांना दिले आहेत. आपण राज ठाकरे आणि मनसेविरोधात कायदेशीर पाऊल उचलणार असल्याने त्यांनी हे आदेश दिल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.

राज ठाकरेंनी पत्रात काय लिहिलं आहे?

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना..
सस्नेह जय महाराष्ट्र.

सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन.

मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं; यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली.

पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे, आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे. आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली, तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची ?

आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी सरकारची आहे. रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे. काल कुठेतरी माध्यामांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का ? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की.

त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका ! सरकारलाही माझे सांगणे आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल, आणि मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल, किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील !

admin
Author: admin

और पढ़ें