जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग या टी 20 स्पर्धेला मागील आठवड्यापासून सुरुवात झाली आहे. शनिवारी आयपीएल 2025 चा नववा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार असून यात दोन्ही संघ विजयाचं खात उघडण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्सकडून गुजरात टायटन्सचा 11 धावांनी पराभव झाला होता तर चेन्नई विरुद्ध खेळलेल्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्सने पराभव झाला होता. तेव्हा गुजरात टायटन्स विरुद्ध सामना जिंकण्यासाठी हार्दिक पंड्या कोणत्या खेळाडूला प्लेईंग 11 मध्ये संधी देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हार्दिक पंड्याकडे नेतृत्व :
गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात शनिवारी सायंकाळी 7: 30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्यापूर्वी अर्धातास अगोदर दोन्ही संघांमध्ये टॉस पार पडेल. चेन्नई विरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या स्लो ओव्हर रेटमुळे झालेल्या बंदीच्या कारवाईमुळे स्वतः प्लेईंग 11 चा भाग नव्हता त्याच्या ऐवजी सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. मात्र आता या सामन्यात हार्दिक पंड्या परतणार असून त्याच्याकडेच संघाचं नेतृत्व असणार आहे.
कोणत्या खेळाडूला मिळणार प्लेईंग 11 मध्ये संधी?
हार्दिक पंड्या परतल्यामुळे रॉबिन मिंजला कदाचित प्लेईंग 11 मधून बाहेर बसावं लागेल. चेन्नई विरुद्ध सामन्यात रॉबिन मिंजचा परफॉर्मन्स चांगला नव्हता त्याला चेपॉकच्या पीचवर संघर्ष करावा लागला. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे उपलब्ध नसणार आहे. हार्दिक हा मुंबईचा एकमेव वेगवान गोलंदाज ऑल राउंडर असेल.
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग 11 :
रोहित शर्मा, रियान रिक्लेटोन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सॅंटनर, दीपक चाहर, ट्रेंट बोल्ट, विग्नेश पुथुर
गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेईंग 11 :
साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शाहरुख खान, वाशिंगटन सुंदर, राहुल तेवतिया, राशिद खान, आर साई किशोर, कॅगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
कुठे पाहता येणार सामना?
अहमदाबाद येथे होणारा मुंबई इंडियन्स विरुद्व गुजरात टायटन्स सामना हा टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनलवर दाखवला जाईल. तर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टारवर दाखवण्यात येईल. संध्याकाळी ७ वाजता सामन्याचा टॉस पार पडेल आणि त्यानंतर ७: ३० वाजता सामन्याला सुरुवात होईल.
