मुंबईत ज्याप्रमाणं रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्या अनेकांचीच पसंती असते अगदी त्याचप्रमाणं रेल्वेमागोमाग या शहरात बेस्ट बसनं प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मुंबई शहरापासून उपनगरापर्यंत प्रवासाची मुभा देणाऱ्या या बेस्ट बसमार्गांवर किमान दरात अगदी एसी बसपर्यंतची सुविधासुद्धा देण्यात येते. असं असतानाच आता बेस्टच्याच वतीनं एक मोठा निर्णय घेण्यात आला असून, काही मार्गांवरील बेस्ट बस सेवा बंद करण्यात येणार आहे.
काय आहे बेस्ट सेवा बंद करण्यामागचं कारण?
काही बेस्ट मार्गांवर कमी बसगाड्या आणि प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांची बसथांब्यावर वाढलेली रांग पाहता पाहता BEST उपक्रमाने यावर तोडगा म्हणून हे पाऊल उचललं आहे. ज्याअंतर्गत अल्प प्रतिसाद असलेल्या मार्गांवरील बेस्ट बस बंद करत त्या बस जास्त गर्दीच्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. यासाठी आता किमान प्रतिसाद असलेल्या बसमार्गांचा अभ्यास केला जात असून येत्या काळात त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सदर उपक्रमाअंतर्गत 20 पेक्षा जास्त बेस्ट बस मार्ग बंद करण्याचा विचार असल्याचंही म्हटलं जात आहे. याशिवाय एक ते दोन तासांच्या अंतरावर प्रवास करणारे प्रवासीही अल्प असून या मार्गांवरी सेवासुद्धा बंद करण्याचा विचार आहे बेस्टच्या वतीनं केला जात आहे.
कमी प्रतिसाद मिळणाऱ्या बसमार्गांवरील बस इतर गर्दीच्या मार्गांवर वळवण्यासमवेत रेल्वे, मेट्रोला बसची जास्तीत जास्त जोड देण्याचा प्रयत्न इथं केला जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक श्रीनिवास यांनी दिली.
नव्या बसची अद्यापही प्रतीक्षाच…
सध्याच्या घडीला बेस्टच्या ताफ्यात मालकी बससमवेत काही भाडेतत्वावरील बसही असून या बसना सर्व स्तरांतून विरोध होत असतानाही याच बसना प्राधान्य देत त्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. सध्या बेस्टचा एकूण बस ताफा हा 2800 पर्यंत असून, डिसेंबर 2024 मध्येही हा आकडा 3175 इतका होता. त्यातच आता बेस्टच्या मालकीच्या जवळपास 700 बस भंगारात काढल्या जाणार असल्यामुळं हे संकट आणखी मोठं होण्याची शक्यता आहे. परिणामी बसच्या कमी संख्येमुळं प्रवाशांना अपेक्षेहून अधिक काळ थांब्यावर प्रतीक्षा रांगेत थांबावं लागत आहे. ही सर्व कारणं पाहता तूर्तास कमी प्रतिसादाचे बेस्ट मार्ग बंद करण्यात येणार असून, अधिक गर्दीच्या मार्गांवर या बस वळवण्यालाच बेस्ट प्रशासन प्राधान्य देताना दिसेल. तेव्हा तुमच्या दैनंदिन प्रवास मार्गातील बसचा तर यात समावेश नाही ना हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
