मे महिन्याची सुरुवात होताच चाहुल लागते ते आंब्याची. आंबा हा अनेकांचा जीव की प्राण असतो. देवगडचा हापूस आंबा म्हणजे आंब्याचा राजा आहे. मात्र आजकाल बाजारात देवगडचा हापूस आंबा म्हणून दुसऱ्याच आंब्याची विक्री केली जाते. ग्राहकांची ही फसवणूक टाळण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. देवगड हापूसच्या नावाने ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी या वर्षीपासून आंब्यावर यूआयडी बारकोड बसवण्यात येणार आहेत.
आंब्यावर आता यूआयडी बारकोड लावण्यात येणार आहेत. यानुसार मुंबई बाजार समितीमध्ये बारकोड असलेल्या आंब्याची आवक सुरू झाली आहे. गुरुवारी असे २०० डजन आंबा दाखल झाला असून, यामुळे आता ग्राहकांची फसवणूक टळणार आहे. कोकणातील देवगड हापूस आंब्याची मागणी जगभरात आहे. मात्र बाजारात बऱ्याचदा कर्नाटकचा आंबाही देवगड हापूसच्या बॉक्समध्ये भरून विक्री केला जातो. देवगड हापूस आंबा कोणता आणि दक्षिणेकडील राज्यातून येणारा हापूससदृश आंबा कोणता, हे ग्राहकांना पटकन ओळखता येत नाही.
देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने हा प्रकार टाळण्यासाठी देवगडमधील हापूस आंब्यावर यूआयडी बारकोड बसविण्यास सुरुवात केली आहे. देवगडमध्ये संघटनेच्या माध्यमातून ५० लाख बारकोड स्टिकरचे वितरण करण्यात आले आहे. या स्टिकरवर स्कॅन केल्यानंतर आंब्याची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून देवगड हापूसची खरी ओळख लक्षात येणार आहे.
गुढीपाडव्याला हापूस आवाक्याबाहेर
हवामानातील बदलांचा कोकणातील हापूस उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. अपेक्षित थंडी न पडल्याने पहिल्या बहरातील मोहोर गळून पडल्याने हापूसच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा तीस ते चाळीस टक्के उत्पादनाची अपेक्षा बागायतदार व्यक्त करत आहेत. परिणामी पाडव्याच्या तोंडावर दरात दुपटीने वाढ झाली. पुणे बाजारपेठेत हापूसच्या डझनाचा भाव १५०० ते दोन हजार इतका आहे. ऐन पाडव्याच्या तोंडावर दरांत दुपटीने वाढ झाली असून, डझनाचा दर दीड ते दोन हजारांवर गेला आहे.
