वसईत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाने कार्बनमोनोक्साईड सिलेंडरमधील वायू प्राशन करत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी ही सगळी घटना घडली असून श्रेय अग्रवाल असं या तरुणाचे नाव आहे. कामण येथील स्पॅनिश व्हिला परिसरातील क्लस्टर 09 या बंगल्यात बुधवारी संध्याकाळी त्याचा मृतदेह सिलेंडरसोबत बांधलेला आढळला.
श्रेय अग्रवाल याने आत्महत्या करण्यापूर्वी खबरदारीदेखील घेतली होती. वायुदुर्घटना होऊ नये यासाठी त्याने घराच्या खिडक्या बंद केल्या होत्या. तसंच चिकटपट्टी लावून धोक्याची सूचनादेखील लिहून ठेवली होती. आत्महत्या करण्यापूर्वी तो दोन दिवस बेपत्ता होता. श्रेयसोबत संपर्क होत नसल्याने त्याच्या बहिणीने मुंबई पोलिस आयुक्तांना ईमेलद्वारे तक्रार केली होती. गुन्हे शाखेने त्याचा तपास सुरू केला.
पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे लोकेशन काढले असता ते वसईच्या कामण येथे असल्याचे समोर आले. मुंबई गुन्हे शाखेने मग याबाबत नायगाव पोलिसांना माहिती दिली. क्लस्टर 09 या बंगल्यात मागील एक वर्षांपासून राहात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली.
पोलिस बंगल्यात पोहोचले असताना दारावरच इंग्रजी भाषेत सूचना देणारी चिठ्ठी लावण्यात आली होती. संपूर्ण घरात कार्बनमोनॉक्साइड पसरला असून घरात आल्यावर दिवे लावू नका अन्यथा स्फोट होईल असा मजकूर त्यावर लिहला होता. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. कार्बन मोनॉक्साईड हा प्राणघातक वायू असल्यामुळे अग्निशमन दलाचे कर्मचारी पीपीई किट व श्वसनासाठी लागणारा बीए सेट (ब्रिथिंग अपॅरटस सेट) करून हायड्रोलिक स्प्रेडर कटरच्या साह्याने बेडरूमचा दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला.
आत पोहोतचात आतील दृश्य पाहून ते हादरले. श्रेयने दोन सिलेंडर दोन्ही हाताला बांधून डोक्यात हेल्मेट घातले होते. गॅस सिलेंडरला एक नळी जोडली आणि ती नळी श्वसनासाठी वापरला जाणार्या नॅब्युलाईझरद्वारे तोंडाद्वारे धरली होती. त्याद्वारे विषारी कार्बनमोनॉक्साईड गॅस शरीरात ओढून घेतला होता. विषेश म्हणजे, विषारी वायू घराबाहेर जाऊ नये यासाठी खिडक्यांना लाकडी फळ्यादेखील लावण्यात आल्या होत्या.
एका गंभीर आजाराने त्रस्त असल्याने आत्महत्या करत असल्याचे श्रेयने एका भिंतीवर लिहून ठेवले होते. त्याच्या घरात ५ कार्बनमोनॉक्साईडचे सिलेंडर आढळले होते. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. त्याने हे सिलेंडर कुठून आणले याचा पोलीस तपास करत आहेत.
