उत्तर प्रदेशातील मेरठे येथे सौरभ राजपूत नावाच्या मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. नंतर त्याच्या मृतदेहाचे 16 तुकडे करुन ते एका ड्रममध्ये भरुन तो सिमेंटने झाकण्यात आला. पोलिसांनी तपास केला असता सौरभ राजपूतची पत्नी मुस्कान रस्तोगीचे साहिल शुक्ला नावाच्या तरुणाशी विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचं उघड झालं.
सौरभ राजपूत आणि मुस्कान यांनी 2016 मध्ये प्रेमविवाह केला होता. पत्नीसह जास्त वेळ घालवता यावा यासाठी सौरभने मर्चंट नेव्हीमधील नोकरी सोडली होती. त्याने घेतलेला हा निर्णय त्याच्या कुटुंबाला पटला नाही. यामुळे त्यांनी घऱ सोडलं आणि भाड्याच्या घरात जाऊन राहू लागले.
2019 मध्ये सौरभ आणि मुस्कान यांना मुलगी झाली. यादरम्यान सौरभला पत्नी मुस्कानचे त्याचा मित्र साहिलशी प्रेमसंबंध असल्याचं समजलं, ज्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण होऊ लागले. यामुळे सौरभने पुन्हा एकदा मर्चंट नेव्हीत जाण्याचा निर्णय घेतला.
झोपेच्या गोळ्या, हत्या आणि ड्रम
सौरभ आणि मुस्कानची मुलगी 28 फेब्रुवारी रोजी सहा वर्षांची झाली, ज्यामुळे तो घरी परतला होता. पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, मुस्कान आणि साहिलने सौरभची हत्या करण्याचा निर्णय घेतला होता. 4 मार्चला सौरभच्या जेवणात मुस्कानने झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि तो झोपला असताना, तिने आणि साहिलने चाकूने त्याची हत्या केली. त्यानंतर, मुस्कान आणि साहिलने मृतदेहाचे तुकडे केले, त्याचे तुकडे एका ड्रममध्ये ठेवले आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ओल्या सिमेंटने सील केले.
जेव्हा लोकांनी सौरभबद्दल विचारले तेव्हा मुस्कानने त्यांना सांगितले की तो एका हिल स्टेशनला गेला आहे. त्यानंतर ती आणि साहिल मनालीला गेले आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी सौरभच्या फोनवरून त्याच्या सोशल मीडिया हँडलवर फोटो अपलोड केले. जेव्हा सौरभने अनेक दिवस त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा कोणताही फोन उचलला नाही, तेव्हा त्यांनी पोलिस तक्रार दाखल केली.
हत्येची कबुली
तक्रारीनंतर मुस्कान आणि साहिल यांना ताब्यात घेण्यात आलं. यानंतर त्यांनी हत्येची कबुली दिली. मेरठ शहराचे पोलिस प्रमुख आयुष विक्रम सिंह म्हणाले, “शंकेच्या आधारे आम्ही त्याची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांना ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान त्यांनी सांगितले की ४ मार्च रोजी त्यांनी सौरभची चाकूने हत्या केली. त्यांनी मृतदेहाचे तुकडे केले, ड्रममध्ये ठेवले आणि सिमेंटने सील केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आम्ही दोघांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.”
