महायुती सरकारच्या वतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. यावर विरोधकांकडून जोरदार टिका होतेय. उद्धव ठाकरे यांनी महायुतीचा जाहीरानामा पत्रकार परिषदेत दाखवत जनतेला दिलेल्या वचनांची आठवण करुन दिली. लाडकी बहीण हफ्ता, शेतकरी योजना याबद्दल त्यांनी महायुती सरकारला प्रश्न विचारले. काय म्हणाले उद्धव ठाकरे? जाणून घेऊया.
आचार्य अत्रे असते तर म्हणाले असते की गेल्या 10 हजार वर्षात इतका बोगस अर्थसंकल्प झाला नसेल. निवडणूक काळात वारेमाप जाहीराती केल्या होत्या. थापा मारायचे थांबणार नाही असे घोषवाक्य हवे. मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
लाडक्या बहिणींना 2100 दिले का? शेतक-यांना कर्जमुक्त केले का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही असे मुख्यमंत्री म्हणाले होते.तुम्हाला उद्धव ठाकरे होता येणार नाही. मी शेतक-यांना कर्जमुक्त केले होते. वीजबिलात 30 टक्के कपात केली का? असा प्रश्न त्यांनी विचारला. कंत्राटदारांसाठी 64 हजार कोटींची कामे मुंबईत होणार आहेत. दोन विमानतळे जोडण्याचे काम हे अदानींचे असल्याची टीका त्यांनी केली.
अजित पवारांनी काय सांगितलं?
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै, 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी आतापर्यंत 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे. 2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे,” अशी माहिती अजित पवारांनी दिली. यावेळी एका आमदाराने त्यांना मधेच रोखून 2100 रुपये झाले ना? अशी विचारणा केली. त्यावर अजित पवारांनी जरा बजेट होऊ द्या सांगत दम ठेवा असा सल्ला दिला. “या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.
