उष्णतेच्या लाटांनी महाराष्ट्रात धडकण्यास सुरुवात केली असून, मार्च महिन्यात त्यांचा नागरिकांना अधिक त्रास सोसावा लागणार आहे. राज्याच्या विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये उष्णता अतिप्रचंड स्वरुपात वाढल्यानं तापमानाचा आकडा 36 अंश सेल्सिअसपलिकडे पोहोचला आहे. दरम्यान, एकाएकी ढगाळ वातावरणानं कोकण किनारपट्टीसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्येसुद्धा हवामानाचं एक वेगळं रुप पाहायला मिळत आहे.
मागील 24 तासांच्या हवामानाचा आढावा घेतल्यास राज्यात कोकण पट्टा, मुंबई शहर आणि सर्व उपनगरांपर्यंत ढगाळ वातावरणानं चिंता वाढवली. प्रखर ऊन नाही, पण सूर्यावर ढगांचं अच्छादन आल्यानं पाऊस आला येईल की नंतर हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करून गेला. हवामान विभागानं राज्याच्या काही भागांमध्ये या उन्हाळी पावसाच्या अगदी हलक्या सरींचाही अंदाज वर्तवला आहे. परिणामस्वरुप दमट हवेला वाव मिळत असून, उष्मा दुपटीनं जाणवण्याची चिन्हं आता पाहायला मिळत आहेत.
हवामानाची ही स्थिती पाहता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागामध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, राज्यात सातारा, रत्नागिरी, परभणी, गडचिरोली, नागपूर, धुळे, जळगाव इथं तापमानाचा आकडा 36 अंशांपलिकडे पोहोचली आहे.
मुंबईत येत्या दिवसात उष्णतेच्या दोन लाटा
येत्या दिवसात मुंबई शहरात उष्णतेच्या दोन येतील. या लाटांमुळे शहरातील कमाल तापमानाचा आकडा 36 अंश तर, राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान 40 अंशांचा भीषण आकडाही गाठण्याची भीती आहे.
मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये मुंबईचे कमाल तापमान सरासरी 34 अंशांदरम्यान असतंपण, यंदा ते 36 अंशादरम्यान राहणार असून, त्यामुळं यंदाचा उकाडा होरपळवणारा आहे हेच आता पुन्हा स्पष्ट होत आहे.
राज्यातील सर्वाधिक उष्ण शहरं
मुंबई – 35.3 अंश सेल्सिअस
पुणे – 37.7 अंश सेल्सिअस
नाशिक – 36.3 अंश सेल्सिअस
सातारा – 37.3 अंश सेल्सिअस
सोलापूर – 38.9 अंश सेल्सिअस
देश स्तरावर हवामानाचा आढाला घेतल्यास राजधानी दिल्लीत तापमानात घट झाली असून, काश्मीरच्या बहुतांश भागांना सोमवारी पावसाचा तडाखा बसला. तर, पर्वतीय क्षेत्रांमध्ये जोरदार हिमवृष्टी झाली. तिथं उत्तराखंडमध्ये चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथोरागढ इथंही पुढील 24 तासांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर हिमाचल प्रदेशातील किन्नौर, कुल्लू आणि चंबासह पर्वतीय क्षेत्रांमध्ये बर्फवृष्टीचा यलो अलर्ट आयएमडीनं जारी केला आहे.
