राज्यात अधिवेशनाला सुरूवात झालीये. मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेवरूनही सरकारवर विरोधक टीका करत आहेत. सरकारने वेगवेगळे निकष लावून लाभार्थी बहिणींची संख्या कमी केल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. शिवाय फेब्रुवारीचा हप्ता मिळणेही बाकी आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरसकट अर्ज पात्र केली. आता मात्र, सर्वे देखील केला जातोय. यापूर्वी दिलेले पैसे लाडक्या बहिणींकडून परत घेतली जाणार नसल्याची भूमिका सरकारची आहे. याबद्दल स्पष्ट बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिसले.
आता नुकताच महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी माहिती दिलीये. आदिती तटकरे यांनी म्हटले की, दोन कोटी चाळीस लक्ष महिलांपर्यंत हा लाभ पोहोचला आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्येही लाडक्या बहिणीचे जे लाभार्थी आहेत, ते तसेच राहणार आहेत. विरोधकांकडून सुरूवातीपासून त्यासंदर्भातील आरोप केला जातोय. ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपतंय.
गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून जो प्रतिसाद महिलांचा या योजनेला मिळतोय तेव्हापासून विरोधकांचे या योजनेवर नैराश्य पसरले आहे. महायुतीचे सरकार सक्षम आहे. लाडकी बहीण योजना आम्ही यशस्वीपणे पुढेही चालू ठेवणार आहोत. ८ मार्चला महिलादिनी लाडक्या बहिणींना २ महिन्यांचे हप्ते देणार आहोत, अशीही मोठी घोषणा ही आदिती तटकरे यांच्याकडून करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अजिबात बंद करणार नाही. वेगवेगळ्या योजनांचा ताण जरी असला तरी लाडकी बहीणसह कोणतीही कल्याणकारी योजना बंद करणार नाही. कारण राज्याची आर्थिक शिस्त आम्ही पाळली आहे. ‘कॅग’च्या निर्देशानुसार जी व्यक्ती लाभास पात्र नसते त्यांचा समावेश योजनेत करता येत नाही, फक्त तितकेच आम्ही पालन करणार आहोत. अशा योजनांना सर्वांत जास्त पैसे देणारे महाराष्ट्र हे देशात एकमेव राज्य आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगोदरच म्हणाले आहेत.
