दिल्ली विधानसभा निवडणुकीची (Delhi Election Results 2025) मतमोजणी सध्या सुरु आहे. या मतमोजणीनूसार भाजपाने (BJP) दिल्लीत जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. तर आपचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या हातातून दिल्ली निसटल्याचे चिन्ह दिसत आहे. सध्या दिल्लीत भाजपची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल दिसत आहे. दिल्लीत भाजप 40, आप 30 जागांवर आघाडीवर. काँग्रेसला एकाही जागेवर आघाडीवर नाही. आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्या या कामगिरीवरुन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Anna Hazare On Arvind Kejriwal)
अण्णा हजारे काय म्हणाले?
अरविंद केजरीवालांचे विचार, चारित्र्य शुद्ध नाही, म्हणूनच पराभव झाला. त्यांचे जीवन निष्कलंक नव्हते. मतदारांचा विश्वास नव्हता की, हे आमच्यासाठी काही करतील. मी त्यांना वारंवार सांगितलं, मात्र त्यांनी ऐकलं नाही, असं अण्णा हजारे म्हणाले. तसेच दिल्लीत दारूच्या ठेक्यांच्या माध्यमातून जो आर्थिक घोटाळा झाला त्यामुळे ते बदनाम झाले. एकीकडे अरविंद केजरीवाल लोकांच्या चारित्र्याबद्दल बोलतात. मात्र दुसरीकडे दारू ठेक्यांमधे घोटाळे करतात, असं लोकांना वाटायला लागलं, असं मतही अण्णा हजारे यांनी मांडलं. त्याचप्रमाणे राजकीय आरोप, प्रत्यारोप तर होतंच असतात, अशी प्रतिक्रिया देखील अण्णा हजारे यांनी दिली.
अरविंद केजरीवाल यांनी सुरुवातीला चांगली कामे केली, पण…
अरविंद केजरीवाल यांनी सुरुवातीला चांगली कामे केली मात्र सत्ता आणि पैशाची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली, अशी टीकाही अण्णा हजारे यांनी केली. दारूचे मोठ्या प्रमाणात लायसन दिले गेले त्यामुळे सामान्य नागरिकांनी आता त्यांना नाकारल्याचं दिसत आहे आज जो कौल आपल्याला पाहायला मिळतो आहे तो दारूच्या दुकानांना दिलेली लायसन्स आणि त्यातून मिळालेले पैसे याचा परिणाम असल्याचं जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
अण्णा हजारेंनी अरविंद केजरीवालांवर केली होती टीका-
अरविंद केजरीवाल सुरुवातीला माझ्यासोबत होता, तेव्हा त्याची नियत साफ होती. तेव्हा मला वाटले की, हा एक चांगला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी त्याला सोबत घेतले होते. मात्र पक्ष आणि पार्टी जेव्हा काढली तेव्हापासून मी त्याची साथ सोडली. मला समजलं की हा स्वार्थी आहे. सुरुवातीला मला तो चांगला वाटला होता, त्याचे आचार विचार चांगले होते. त्याच्या डोक्यात पक्ष आणि पार्टी नव्हती. मात्र, आता हेच दारूबाबत बोलत आहेत. दारूसाठी आम्ही आंदोलन केले होते त्यावेळी ते देखील आमच्यासोबत होते. आता तेच दारूबाबत बोलत आहेत त्यामुळे मी त्याला सोडून दिले. काही लोक सांगतात की, अण्णा हजारे यांच्यामुळे हे आलेत. मात्र, ही गोष्ट चुकीची आहे. सुरुवातीला तो चांगला माणूस होता, नंतर मला जेव्हा समजलं तेव्हा मी त्याच्यापासून दूर झालो, असा हल्लाबोल अण्णा हजारे यांनी केला होता. तसेच जो उमेदवार आहे, त्याचे चारित्र्य कसे आहे? त्याचे आचार-विचार कसे आहेत? त्याचे जीवन कसे आहे? हे पाहूनच मतदान करा, असे आवाहन देखील अण्णा हजारे यांनी केलं होतं.
