मागील 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आल आहे. गुजरातमधील भिलाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सरिग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात 40 फूट खोल अशोक धोडी यांचा मृतदेह आणि त्यांची गाडी आढळून आली आहे. कौटुंबिक वाद आणि इतर वादातून त्यांच्या भावानेच आपल्या साथीदारांना सोबत घेऊन अशोक धोडी यांची हत्या केल्याचं यानंतर उघड झालं आहे. तर अशोक धोडी यांचा मृतदेह शविच्छेदनासाठी जे.जे रुग्णालयात नेण्यात आला आहे.
20 जानेवारीपासून बेपत्या असलेल्या अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना 12 दिवसानंतर यश आलं. मुंबईतून घरी परतत असताना अशोक धोडी यांच्या भावानेच त्यांचं अपहरण करून हत्या केल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी थेट गुजरात गाठला असून गुजरातच्या सरिग्राम येथील दगड खाणीत अशोक धोडी यांचा मृतदेह आणि गाडी थेट 40 फूट खोल पाण्यात ढकळली. 12 दिवसानंतर पालघर पोलिसांना अशोक धोडींसह त्यांच्या गाडीचा शोध घेण्यात यश आलं. तब्बल 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पालघर पोलिसांनी अशोक धोडी यांचा मृतदेह गाडीसह बाहेर काढला.
आरोपी अविनाश धोडी याचा दारू तस्करीचा अवैध धंदा असून या धंद्यात अशोक धोडी अडचण ठरत असल्यानेच अविनाश धोडी यांनी त्यांचं अपहरण करून हत्या केली . या प्रकरणात चार आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अविनाश धोडी याच्यासह आणखीन तीन आरोपी फरार आहेत. या फरार आरोपींचा पालघर पोलीस सध्या शोध घेत आहेत. त्यांचाही लवकरच शोध घेऊन अटक केलं जाईल असा विश्वास यावेळी पालघरच्या पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी धोडी कुटुंबाला दिला आहे.
अशोक धोडी यांचा मृतदेह शोधण्यात पालघर पोलिसांना यश आल्याने अशोक धोडी यांचा मुलगा आकाश धोडी यांनी पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं. मात्र माझ्या वडिलांचा जीव गेला त्याप्रमाणे आरोपींना देखील फाशीची शिक्षा द्यावी असं सांगतानाच त्यांनी आमच्या कुटुंबीयांनाही आरोपींपासून धोका असल्याची भीती व्यक्त केली. तसंच मुख्य आरोपी अविनाश धोडी याला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोर शिक्षा करावी अन्यथा आमच्या गावातील नागरिकांना देखील त्याच्यापासून धोका असल्याच देखील यावेळी आकाश धोडी म्हणाला.
