प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला.
प्राथमिक माहिती काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानच्या मुंबईत राहत्या घरात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या व्यक्तीने त्याच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सैफ जखमी झाला असून लिलावती रुग्णालयामध्ये त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, डिलेव्हरी बॉयचे कपडे घालून आलेल्या चोराने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला.
रात्री सैफच्या घरात नक्की घडलं काय?
प्राथमिक माहितीनुसार, सैफ अली खानच्या घरात बुधवारी रात्री एक चोर शिरला होता. घरात चोर शिरल्याचं समजल्यानंतर सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली. ही आरडाओरड ऐकून बाहेर नेमका काय गोंधळ सुरु आहे हे पाहण्यासाठी झोपेतून जागा झालेला सैफ अली खान बेडरुममधून बाहेर आला. सैफ जसा त्याच्या बेडरुममधून बाहेर आला तसा त्याच्या समोर हा चोर उभा असल्याचं दिसलं. एकीकडे चोर घरात शिरल्याने कर्मचाऱ्यांचा गोंधळ सुरु असतानाच सैफ अली खान आणि चोर आमनेसामने आले. यावेळी सैफला काही समजण्याच्या आधीच चोराने सैफ आपल्याला पकडेल या भीतने त्याच्याकडील चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सैफ अली खानला दुखापत झाली. सैफ जखमी झाल्यानंतर घरातील नोकरचाकर तातडीने त्याच्या मदतीला धावले. त्यांनी सैफला लिलावती रुग्णालयात दाखल केलं. सर्वजण जखमी झालेल्या सैफच्या मदतीला धावल्याने या संधीचा फायदा घेत चोराने पळ काढला. या घटनेनं एकच खळबळ माजली आहे.
पोलिसांनी सुरु केला शोध
या प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून तपास हाती घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. हल्लेखोर नेमका कोण होता? घटना घडली तेव्हा घरात कोण कोण होतं? नक्की काय घडलं आणि इतरही प्रश्नांची उत्तर शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैफवर हल्ला करणाऱ्या चोराला शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले आहे.









