रविवार म्हटलं की सहसा सुट्टीच्या दिवशी कैक कारणांनी घराबाहेर पडणाऱ्यांचा आकडा मोठा असतो. अशा वेळी रस्ते मार्गानं प्रवास करण्याऐवजी रेल्वेनं प्रवास करण्याला अनेकांचच प्राधान्य असतं. पण, या रविवारी हा निर्णय काहीसा महागात पडू शकतो. कारण Mumbai Local च्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
शनिवारी मध्यरात्रीपासूनच हे ब्लॉकचं वेळापत्रक लागू राहणार असून, त्यामुळं लोकल रेल्वेसेवांसह लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवाही प्रभावित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. रेल्वे विभागाच्या माहितीनुसार विविध ठिकाणी पुलांच्या गर्डर लाँचिंगसाठी शनिवार आणि रविवारी मध्य रेल्वेवर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
सदर ब्लॉकमुळं काही लांब पल्ल्याच्या रेल्वेचे मार्ग बदलण्यात येणार असून, उपनगरीय लोकल सेवा दरम्यानच्या काळात ठप्प राहणार आहे. रविवारी लागू असणाऱ्या या ब्लॉकदरम्यान विविध अभियांत्रिकी आणि सिग्नल यंत्रणेची कामं पूर्ण करण्यात येणार आहेत. परिणामी मध्य रेल्वेवर सकाळी 9.34 ते दुपारी 3.40 या वेळेत ठाणे आणि कल्याण या स्थानकांदरम्यान सर्व जलद लोकल सेवा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
दरम्यानच्या काळात लोकल कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील तर, मेल एक्सप्रेस पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर वळवण्यात येतील. हार्बर रेल्वे सेवाही या काळात प्रवभावित राहणार असून, सकाळी 10.35 ते दुपारी 4.10 वाजता वाशी ते नेरुळ स्थानकांदरम्यान सर्व लोकल सेवा रद्द केल्या जाणार आहेत.
पश्चिम रेल्वेवर काय परिणाम?
पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री 12.30 वाजल्यापासून रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत भाईंदर आणि वसई रोड या स्थानकांदरम्यान काही रेल्वे रद्द करण्यात येणार असून, धीम्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील.
