भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि विरारचे भाजपचे उमेदवार राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंवर नालासोपारा मतदारसंघात पाच कोटी रुपये वाटप केल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यानंतर विरारमधील एका हॉटेलमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं.
विरार पूर्वच्या विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत असताना बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये धडकले. त्यांनी थेट विनोद तावडेंवर प्रश्नांची सरबत्ती केली. काही काळ तावडे आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही पाहायला मिळाली.
दरम्यानच्या काळात पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण विनोद तावडे होते त्याच्या शेजारील टेबलवर बविआ कार्यकर्त्यांच्या हातात काळ्या रंगाची बॅग लागली. त्या पाकिटातून नोटांची बंडलं बाहेर आल्यानंतर तर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना प्रश्न विचारत थेट 4 तास हॉटेलमध्येच रोखून धरलं होतं.
क्षितिज ठाकूर भडकले
बविआ कार्यकर्त्यांचा राडा सुरू असतानाच क्षितिज ठाकूर विवांता हॉटेलमध्ये पोहोचले.. झाल्या प्रकारामुळे संतापलेल्या क्षितिज ठाकूरांनी विनोद तावडेंसमोर, भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात रौद्ररुप धारण केलं. केवळ एवढ्यावरच क्षितिज ठाकूर थांबले नाहीत तर त्यांनी विनोद तावडेंसमोर बॅगेतून सापडलेली डायरी आणि कॅशवरून प्रश्नांचा भडिमार केला.
जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली
वसईच्या तुळींज विवांता हॉटेलमध्ये भाजप नेते विनोद तावडे आणि भाजपचे काही कार्यकर्ते तेथे पैसे वाटप करत असल्याची तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाची टीम तिथे पोचली. त्या ठिकाणी एसएसटी टीमला नऊ लाख 93 हजार पाचशे रुपये सापडले आहेत. त्याचबरोबर इतर कागदपत्रेही सापडले आहेत. त्या पद्धतीने कार्यवाही सुरू असून पोलिसांनीसुद्धा तशी तक्रार दाखल केली आहे. या हॉटेलची पूर्ण तपासणी करून त्याबाबतीत पूर्ण कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे एक तासाच्या आत सदर बाबतीत गुन्हाही दाखल करण्यात येईल असे मत पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी व्यक्त केला आहे.
भाजप नेत्यानेच माहिती दिल्याचा हितेंद्र ठाकूरांचा दावा
क्षितीज ठाकूरांपाठोपाठ स्वत: हितेंद्र ठाकूरही हॉटेलमध्ये पुोहोचले. त्यांनीही आधी विनोद तावडेंना प्रश्न विचारले. तसंच भाजप नेत्यानेच फोन करून, तावडे 5 कोटी घेऊन विरारमध्ये येणार असल्याची माहिती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.