Maharashtra Assembly Election: …तर मला अटक करतील; जाहीर सभेत CM शिंदेंनी व्यक्त केली भिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रविवारी भाऊबीजेच्या दिवशीच प्रचाराचा श्रीगणेशा केला. कुर्ल्यातील नेहरुनगर मतदारसंघामधील मंगेश कुडाळकर यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रचार सभा घेतली. यावेळेस बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपल्याला अटक होऊ शकते असंही म्हटलं. लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं.
23 तारखेला आपण आयटम बॉम्ब फोडणार…
“मुंबईतली ही पहिली सभा आहे. त्याचा मान कुर्ला मतदारसंघाला मिळाला आहे. मंगेश कुडाळकर हे ओपनिंग बॅट्समन झाले आहेत. ते नक्कीच चौकार मारणार आणि बाकीच्या लोकांना क्लीन बोल्ड करणार. मागच्या वेळी कुडाळकर 24 हजार मताधिक्याने निवडून आले आता दुप्पटीने येणार,” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तसेच पुढे बोलताना, “आज दिवाळी आहे फटाके फुटत आहेत. काही ठिकाणी लवंग्या फुटत आहेत. 23 तारखेला आपण आयटम बॉम्ब फोडणार आहोत,” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
तुम्हाला आता फक्त वर्षाला भाऊबीज नाही मिळणार तर…
लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी, “आता दर महिन्याला ओवाळणी मिळणार आहे. लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार विरोधकांनी सांगितलं आहे. रामदास आठवले आपल्या सोबत आहेत. भाजपा आपल्या सोबत आहे. अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या सोबत आहे. आज भाऊबीज आहे. तुम्हाला आता फक्त वर्षाला भाऊबीज नाही मिळणार तर दर महिन्याला भाऊबीज मिळणार. ज्यांच्या खात्यात पैसे नाही जमा झाले त्यांच्या खात्यात सुद्धा जमा होणार हा निरोप द्यायला आलो आहे. विरोधक म्हणतात की ही योजना बंद होईल. महिलांना विकत घेतात त्यांचा स्वाभिमान विकत घेतात असं विरोधक म्हणतात त्यांना तुम्ही काय म्हणाल? या योजनेत खोडा घालणाऱ्या विरोधकांना तुम्ही चपलेचे जोडे दाखवणार की नाही?” असा सवाल उपस्थित महिलांना विचारला.
उद्धव ठाकरेंचा थेट उल्लेख न करता लगावला टोला
“काँग्रेसचे राहुल गांधी म्हणतात, ‘खटखटाकट पैसे देणार’ असं म्हणाले आणि वोट घेतले. ते मतं घेतल्यानंतर मागे फिरतात. मात्र तुमचा हा भाऊ जे बोलतो ते करून दाखवतो. राजस्थानमध्ये त्यांनी योजना आणली आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हिमाचलमध्ये सुद्धा असंच म्हणाले की योजना आणतो आणि नंतर म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक झाली. आम्ही असं कधीही करणार नाही,” असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. “बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी आम्हाला जे शिकवलं ते आम्ही करतो आम्ही लोकांना फसवत नाही. आम्ही घरात बसून फेसबुक लाईव्ह करणारे नाही. आम्ही फेस टू फेस काम करणारे लोक आहोत,” असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा थेट उल्लेख न करता लगावला.
लाडकी बहीणचा पुढचा हफ्ता कधी येणार? हे ही सांगितलं
“फक्त लाडक्या बहिणींना नाही तर आम्ही ही योजना अजून वाढवणार आहोत. आता निवडणुकीचे आचारसंहिता लागली आणि विरोधकांना वाटलं की आता नोव्हेंबरचे पैसे मिळणार नाहीत. आम्हाला माहीत होतं की विरोधी पक्ष चालख आहे. पण आम्ही ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबर महिन्याचे पैसे दिलेत. त्यामुळे विरोधकांचे तोंड बंद झालं. आता 20 तारखेला जसे निवडणुका संपतात तसे आम्ही डिसेंबर महिन्याचे पैसे सुद्धा तुम्हाला देणार आहोत. फक्त पंधराशे आणि दोन हजार असे रुपये आम्ही नाही देणार तर आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही तर बहिणींना लखपती बनवणार आहोत. ऍडव्हान्स देणारे हे सरकार आहे. आधीचे सरकार ॲडव्हान्स घेणारे होते आम्ही देणारे आहोत. पाच हप्ते तुमच्या खात्यात आले. मागचे सरकार हप्ते वसूल करणारे सरकार होते. त्यांची घेना बँक आहे आमची देना बँक आहे,” असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला.
…तर मला तुरुंगात टाकतील
“ही (लाडकी बहीण) योजना बंद करण्यासाठी ते कोर्टात गेले होते पण कोर्टाने चपराक लगावली. ते लोक असं म्हणत असतील की लाडक्या बहिणीला ज्यांनी पैसे दिले ते गुन्हेगार आहेत तर असे गुन्हे करायला मी एकदा नाही तर दहा वेळा गुन्हे करायला तयार आहे,” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. “लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेस, महाविकास आघाडीचे लोक नागपूरमध्ये कोर्टात गेले. आता ते म्हणतात की, आमचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेबरोबरच इतर योजना बंद करु. या योजनांची चौकशी केली जाईल असं ते म्हणत आहेत. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना तुरुंगात टाकू असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे तुमच्या या लाडक्या भावालाही तुरुंगात टाकतील. हे चालेल का तुम्हाला? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थित महिलांना विचारला. त्यावर महिलांनी, “नाही,” असं एका सुरात उत्तर दिलं.