मंदिरातून का हटवल्या जात आहेत साईबाबांच्या मूर्ती, कोण होते साईबाबा? नव्या वादाला फुटलं तोंड
शिर्डीच्या साईबाबांचे देशभरात करोडो भक्त आहेत. महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi) इथं साईबाबांचं मोठं मंदिर (Saibaba Temple) आहे. देशातील कानाकोपऱ्यातून दररोज लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनसाठी शिर्डीत येतात. देशातल्या अनेक मंदिरांमध्ये साईबाबांच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत. पण आता यावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. वाराणसीमधल्या अनेक मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या जात आहेत. सनातन रक्षक दल मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीवर सफेद कपडा गुंडाळून मूर्ती हटवत आहेत.
याआधी देखील शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यानी साईपूजेला विरोध केला होता. साईबाबांना महात्मा म्हणून पूजलं जाऊ शकतं, पण देव म्हणून नाही. याशिवाय साई बाबा हिंदू होते की मुस्लिम असा वाद नेहमीच होत आला आहे. जाणून घ्या साईबाबांशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी.
सनातन रक्षक दलाची भूमिका
सर्वात आधी काशीतल्या सर्वात मोठ्या गणेश मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवण्यात आली. सनातन रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी गणेश मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीला सफेद कपडा गुंडातून मंदिरातून मूर्ती हटवली.काशी या धार्मिक नगरीत सनातन धर्माच्या देवी-देवता आहेत, तर मग काशीच्या मंदिरात साईंची पूजा का करावी, असं सनातन रक्षक दलाचं म्हणणं आहे. याशिवाय अगस्तेश्वर आणि भूतेश्वर मंदिरासह ज्या मंदिरात साईबाबांची मूर्ती आहे ती हटवली जाणार असल्याचं सनातन रक्षक दलाने म्हटलं आहे. वाराणसीत आतापर्यंत 14 मंदिरांमधून साईबाबांची मूर्ती हटवण्यात आली आहे.
साईबाबांचं जीवन
साईबाबांचा जन्म कुठे झाला त्यांचे आई-वडिल कोण होते, याबाबत कोणालाच माहित नाही. कारण साईबाबा यांनी कधीच आपल्याबद्दलची माहिती कोणाला सांगितली नाही. केवळ एकदा एका भक्ताने खूप विनवणी केल्यानंतर साईबाबांनी आपला जन्म 28 सप्टेंबर 1836 मध्ये झाल्याचं सांगितलं. त्यामुळेच 28 सप्टेंबरला देशभरात साईबाबांचा जन्मत्सोव साजरा केला जातो.
साईबाबांचं खरं नाव
साईबाबांच्या खऱ्या नावाबाबत बराच गोंधळ आहे. काही ठिकाणी त्यांचं नाव चांद मियाँ असल्याचं सांगितले जातं तर काही लोक त्यांना हिंदू मानतात.
साईबाबा देवाचा अवतार
साईबाबांना देवाचा अवतार असल्याचं मानलं जातं. काही लोक साईबाबांना भगवान दत्तदत्तात्रेय मानतात तर काही लोक त्यांना भगवान शिवाचा अवतार मानतात. साईबाबा आपला बराचसा वेळ समाधीत घालवत.
मंदिरातून का हटवल्या जात आहेत मूर्ती?
नव्या वादावर बोलताना सनातन रक्षक दलाने शास्त्रांचं कारण दिलं आहे. कोणत्याही मंदिरात मृत मानवाची मूर्ती बसवून पूजा करणे निषिद्ध आहे. हिंदू धर्मातील मंदिरांमध्ये केवळ सूर्य, विष्णू, शिव, शक्ती आणि गणपती या पाच देवांच्या मूर्तींची पूजा केली जाते, असं सनातन रक्षक दलाने म्हटलं आहे.