रक्षकच बनले भक्षक! पोलिसांकडून तरुणीचा विनयभंग
नांदेडवरून देवगडमध्ये फिरायला आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी येथील एका युवतीला छेडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. रक्षकच जेव्हा भक्षक होतात तेव्हा नागरिकांमध्ये असुरक्षिततेची आणि सोबतच संतापाची लाट उटते. या प्रकारानंतर नागरिकांनी त्यांना चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. सध्या त्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे
देवगड एसटी स्टॅण्डमार्गे आपल्या घरी परतणाऱ्या एका युवतीची छेडछाड, विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हरिराम मारुती गिते (३३, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड) याच्यासह सहा संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांमध्ये चारजण पोलीस सेवेत आहेत. ही घटना 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. पोलिसांनी संशयित आरोपींना देवगड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना शनिवारपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आमदार नितेश राणे यांनी ही देवगड पोलीस स्थानकात भेट देत प्रकरणाचा आढावा घेतला.देवगड येथे इनोव्हा कार घेऊन पर्यटनासाठी आलेले संशयित हरिनाम गिते, माधव सुगराव केंद्रे,सटवा केशव केंद्रे,श्याम बालाजी गिते,शंकर संभाजी गिते,प्रवीण विलास रानडे हे मंगळवारी सायंकाळी एसटी स्टॅण्डमार्गे देवगड बाजारपेठेच्या दिशेने जात होते. याचमार्गे पीडित युवती ही आपल्या घरी परतत होती. या रस्त्यावरील आनंदवाडी येथे जाणाऱ्या मार्गावरील वळणाच्या ठिकाणी संशयित आरोपींनी युवतीला पाहून कार थांबवली.
कारमधील संशयित हरिनाम गिते याने पीडित युवतीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिचा हात पकडून ‘माझ्यासोबत येतेस का?’तुला वसई फिरवतो’,असे विचारले. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून संशयित माधव केंद्रे, सटवा केशव केंद्रे, श्याम गिते, शंकर गिते,प्रवीण रानडे या संशयितांनी पीडित युवतीकडे पाहून टिंगलटवाळी केली. ‘तिला गाडीत घे,नंतर काय ते बघू’असे बोलून पीडित युवतीला गाडी मधून घेऊन जाण्याच्या इराद्याने व बेकायदेशीर कोंडून ठेवण्याची व गंभीर इजा पोहोविण्याच्या उद्देशाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
याबाबतची फिर्याद पीडित युवतीने देवगड पोतीस स्थानकात दिली असून संशयित हरिनाम गिते,माधव सुगराव केंद्रे, सटवा केशव केंद्रे, श्याम बालाजी गिते,शंकर संभाजी गिते, प्रवीण विलास रानडे या संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम ७४, ७५ (२), १४० (१), १४० (३), १४० (४), ६२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयितांना देवगड पोलिसांनी देवगड न्यायालयासमोर हजर केले.न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपींच्यावतीने अॅड. श्यामसुंदर जोशी यांनी काम पाहिले. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण देवकर करीत आहेत. दरम्यान यातील चार जण हे पोलीस कर्मचारी होते त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना काळीमा असणारी ही घटना आहे या घटने दरम्यान तेथील ग्रामस्थ व महिलांनी छेड काढणाऱ्या व्यक्तींना रस्त्यावर बसवून यथेच्छ चोप दिला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे