देश

बदलापूर-नवी मुंबई अंतर फक्त 20 मिनिटांत गाठता येणार; कल्याण-डोंबिवलीकरांनाही मिळणार दिलासा

बदलापूर- नवी मुंबई विमानतळ प्रवास अतिवेगवान आणि सूकर होण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून बदलापूर-नवी मुंबई विमानतळ दरम्यान प्रवेश नियंत्रण मार्ग (अॅक्सेस कंट्रोल रोड) या नव्या प्रकल्पाची योजना आखली आहे. हा मार्ग 20 किमीचा असून यासाठी 10.833 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग सेवेत दाखल झाल्यानंतर बदलापूर-नवी मुंबई अंतर केवळ 20 मिनिटांत पार करता येणार आहे.

बदलापूर-नवी मुंबई हा मार्ग प्रस्तावित विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेला जोडला जाणार आहे. त्यामुळं पुढं मुंबई-बदलापूर आणि विरार अलिबाग असा प्रवासही करता येणार आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करण्यात येणार आहे. प्रकल्पाचे काम हाती घेतल्यानंतर पाच वर्षांत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर या शहरांमधून मुंबईत येण्यास लागणाऱ्या प्रवासाच्या वेळात ६० मिनिटांची तर नवी मुंबईपर्यंतच्या प्रवासाच्या वेळेत ३० मिनिटांची बचत होणार आहे. हा महामार्ग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एनएआयएनएशी कनेक्टिव्हिटी करून देईल. तसेच ठाणे आणि जवळपासच्या महामार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत करेल.

बदलापूर ते विरार मल्टीमोडल कॉरिडॉरसाठी ॲक्सेस-कंट्रोल्ड महामार्ग प्रकल्पात ८ लेन असलेली विभाजित मार्गिका आणि सर्व्हिस रोड असतील. त्यामुळे ८० किमी प्रति तासाचा वेग कायम ठेवता येईल. प्रमुख मार्गांशी जोडण्यासाठी मोठ्या इंटरचेंजचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यात मुंबई-वडोदरा स्पर, काटई-बदलापूर आणि कल्याण रिंग रोड यांचा समावेश आहे.

दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांची १५८ वी प्राधिकरण बैठक मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) दळणवळण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास वृद्धी करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीत काही महत्त्वाच्या शहरी प्रकल्पांवरही चर्चा झाली. तसेच बॅकबे रिक्लमेशनसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी विकास आराखड्यांचे पुनरावलोकन करण्यावर देखील भर देण्यात आला.

Related Articles

Back to top button