पश्चिम रेल्वेवर होतंय नवीन टर्मिनस; लांब पल्ल्याच्या गाड्या आता येथूनच पकडा, मेट्रोही जोडणार
पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वांद्रे, सीएसएमटी आणि कुर्ला एलटीटी ही स्थानके गाठावी लागतात. मात्र, आता पश्चिम रेल्वे मार्गावरही एक नवीन टर्मिनस होत आहे. मुंबईतील हे सातवे टर्मिनस उभारण्यात येत आहे. या टर्मिनसचे काम 76 टक्के पूर्ण झाले आहे. या टर्मिनसमुळं पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच हे नवीन टर्मिनस प्रवाशांसाठी सुरू होणार आहे.
पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची नेहमीची तक्रार असते ते म्हणजे लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जावे लागते. आता लांब पल्ल्याच्या गाड्यांना वांद्रे व बोरिवली स्थानकातही थांबा देण्यात आला आहे. मात्र, येथेही मर्यादित स्वरुपातच गाड्या सोडल्या जातात. पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी व राम मंदिरा लगतच नवीन टर्मिनस उभारण्यात येत आहे. या टर्मिनसवर वांद्रे आणि मुंबई सेंट्रल येथून अंदाजे 12 लांब पल्ल्यांच्या गाड्या स्थलांतरित होऊ शकतात. त्यामुळं उपनगरीय रेल्वे मार्गावरील ताणदेखील कमी होणार आहे. सध्या या प्रकल्पाच्या लेबर शेडचे काम पूर्ण झाले आहे.
पश्चिम रेल्वेवरील राम मंदिर रेल्वे स्थानक आणि जोगेश्वरी टर्मिनस यांच्यामधील अंतर सुमारे 500 मीटर आहे. राम मंदिराच्या विरार दिशेकडील पादचारी पुलाच्या पादचारी पुलाच्या उतरणीच्या पायऱ्यांची जोडणी जोगेश्वरी टर्मिनसला देण्यात येणार आहे. तसंच, या टर्मिनसवरुन 24 डब्याच्या रेल्वे गाड्यादेखील चालवता येऊ शकतात असे फलाट निर्माण करु शकतात. तसंच, सार्वजनिक सुविधा व्हावी यासाठी वाहनांसाठी विशेष व्यवस्थादेखील असणार आहे. पादचारी प्रवाशांसाठी राखीव क्षेत्र आहे. तसंच, खासगी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ असणार आहे.
टर्मिनस उभारण्यासाठी 76 कोटींचा खर्च अपेक्षित असणार आहे. रेल्वेच्या अर्थसंकल्पात या निधीची तरतूद करण्यात येणार आहे. जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून 2019मध्ये आणि पुन्हा 2021 मध्ये मंजुरी मिळाली होती. बेट आणि होम प्रकारचे एकूण 2 प्लॅटफॉर्म आणि 3 मार्गिका या नव्या टर्मिनसमध्ये असणार आहे. दोम मजली सेवा इमारती आणि पाच मजली स्टेशन इमारत असणार आहे. त्याचबरोबर, मेट्रो मार्ग 7, मेट्रो मार्ग 2अ, आणि मेट्रो मार्ग 6च्या प्रवाशांना मिळणार लांब पल्ल्याच्या ट्रेन्सपर्यंत कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.