मोठी बातमी! मुंबईत आज सकाळच्या सत्रातील सर्व शाळा, कॉलेजना सुट्टी
मुंबईत काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. मध्यरात्री 1 ते सकाळी 7 या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळं विविध ठिकाणी पाणी साचलं आहे. लोकलसेवादेखील विस्कळीत झाली आहे. आजही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी, मुंबईतील (BMC क्षेत्र) सर्व BMC, सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना पहिल्या सत्राची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईत काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. दादर, सायन, माटुंगा येथे सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तसंच, भांडुप, सायन येथे रेल्वे रुळांवरही पाणी आलं आहे. त्यामुळं मध्य रेल्वे व हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. आजही हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं मुंबई महानगरपालिकेने मुंबईज आज सकाळच्या सत्रातील सर्व शाळांना व कॉलेजना सुट्टी जाहीर केली आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील सत्राचा निर्णय जाहीर केला जाईल, असं महानगर पालिकेकडून सांगण्यात येत आहे.
रायगड – अलिबाग व मुरुड तालुक्यातील शाळा , महाविद्यालयाना सुट्टी
रायगड जिल्ह्यालाही पावसाने झोडपलं आहे. अनेक भागात ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. त्यामुळं घराघरात पाणी शिरले आहे. मुसळधार पाऊस बरसत असल्याने आज जिल्हा प्रशासनाने रायगड – अलिबाग व मुरुड तालुक्यातील शाळा , महाविद्यालयाना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. अलिबाग मुरुड तालुक्यात काही भागात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळं पावसाची शक्यता लक्षात घेवून प्रशासन अलर्ट मोडवर आहे. रायगड जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी
मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यापार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचे परिपत्रक तातडीने जारी करण्याचे आदेश दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग आणी रत्नागिरी जिल्ह्याच्या कलेक्टरना दिले आहेत.
लोकलसेवा विस्कळीत
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका लोकलसेवेला पडला आहे. मध्य व हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. हार्बरच्या मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ पावसाचं पाणी रुळांवर आल्यानं इथंही रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. तर, सायन, भांडुप येथे रेल्वे रुळांवर पाणी आल्याने धीम्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. तर, जलद मार्गावरील वाहतूक हळहळू पूर्वपदावर येत आहे