देश

‘हिट अँड रन’ प्रकरणातील ‘त्या’ आरोपीचे अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण

नागपुरातील हिट अँड रन केस प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कित्येक महिने फरार असलेल्या आरोपी रितिका मालू हिने अखेर काल पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. 25 फेब्रुवारी 2024 रोजी मध्यरात्री क्लबमधून घरी परत जात असताना आपल्या मर्सिडीज कारने धडक दोन तरुणांना धडक दिली होती. त्यात दोघांचाही मृत्यू झाला होता. या अपघातानंतर आरोपी रितिका मालू ही फरार होती. पोलिसांकडून तिचा कसून शोध घेण्यात येत होता. अखेर 1 जुलै रोजी तिने स्वतःहून आत्मसमर्पण केले आहे.

नागपुरातील राम झुला उड्डाणपुलावर अपघाताची ही घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती. रितू मालू व त्यांची मैत्रीण सीपी क्लबमध्ये गेल्या होत्या. तिथून दोघी मध्यरात्री एक ते दोन वाजेच्या दरम्यान मर्सिडीज कारने घरी परतत असताना रामझुल्यावर रितू मालूनी कारचा वेग वाढविला आणि समोर दुचाकीवर जाणाऱ्या दोन तरुणांना जोरदार धडक दिली. यात मोहम्मद हुसेन व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया यांचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी तहसील पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून रितू यांना अटक केली होती. त्या नंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले तेव्हा न्यायालयाने रितू मालू यांना अंतरिम जामीन दिला होता. पुढे सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे, तसेच आरोपी महिला चालकाच्या वैद्यकीय चाचणीच्या आधारावर पोलिसांनी अपघाताचा सखोल तपास करत रितू मालू यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. रितिकावर या घटनेनंतर तहसील पोलिसांनी रितिकाविरुद्ध भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), (निष्काळजीपणाने २७९ वाहन चालविणे), ३३६ (मानवी जीव धोक्यात टाकणारी कृती करणे), ३३८ (गंभीर जखमी करणे), ४२७ (आर्थिक नुकसान करणे) आणि मोटर वाहन कायद्यातील कलम १८४ (भरधाव वेगात वाहन चालविणे) व १८५ (दारूच्या नशेत वाहन चालविणे) या गुन्ह्यांतर्गत एफआयआर दाखल केला होता.

दरम्यान, अटक टाळण्यासाठी रितू मालू यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला होता. न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर रितिका मालू फरार झाल्या होत्या आणि तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर काल रितिका मालू हिने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

Related Articles

Back to top button