देश

भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; लोणावळ्यात संध्याकाळी 6 नंतर पर्यटकांसाठी ‘संचारबंदी’

लोणावळ्यातील (Lonavala)  धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याचअनुषंगाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde)  कठोर कारवाईचे आदेश दिलेत. संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आलंय. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही बडगा उगारला जाणार आहे, असं पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी जाहीर केलंय. पुढच्या काही तासांत लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर केली जाणार असल्याचं ही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

लोणावळ्यात हुल्लडबाजी करणऱ्या तरुणांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. इतर पर्यटांना त्रास होईल असे वर्तन, हुल्लडबाजी आम्ही सहन करणार नाही. त्यांच्यावर कारवााई निश्चित होणार आहे. सार्वजनिक सुट्ट्या आणि विकेंडला अनेक तरुण- तरूण येतात.  रात्री गोंधळ घालणे, हुल्लडबाजी करणे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संध्याकाळी सहानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जर संबंधित अधिकाऱ्याने कारवाई करण्यात दिरंगाई केली तर आम्ही थेट अधिकाऱ्यावरच कारवाई करणार आहे. तसे आम्हाला मुख्यमंत्र्यांचे आदेश आले आहेत, असे  जिल्हाधिकाऱ्यांनी  सांगितले आहे.

लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली (Lonavala Guideline) 

लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर करणार आहे. लोणावळा, खंडाळा परिसरातील  निसर्गसौंदर्य हे पावसळ्यात  पर्यटकांना भुरळ पडत आहे. त्यामुळे विकेंडच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे. पुणे-मुंबईसह लगतच्या भागातून नागरिक या ठिकाणच्या विविध पॉईंटवर गर्दी करत आहेत. मात्र, पर्यटकांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी नेमून दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. अपघात, पाण्यामध्ये तरुणाचा अतिउत्साह आणि व्हीडीओ आणि रिलीज या नादात घातपात होण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली आहे.

हुल्लडबाजी आम्ही सहन करणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा

लोणावळा, मुळशी, मावळ  तसेच पवना परिसरातील नदी, धबधबे या ठिकाणी पाण्यात उतरून तरुणांनी अतिउत्साहीपणा करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. रविवारी भुशी  धरणात पुण्यातील पाच जणांचा मृत्यू झाला. ताम्हिणीत देखील एकाचा अतिउत्साहाच्या नादात एकाचा मृत्यू झाला आहे.  लोणावळा, मावळ या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या ठिकाणच्या धरणामध्ये खोलीचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे येथील निसर्गाचा आनंद घेताना इतरांच्या जिवाला धोका होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने नेमून दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

Related Articles

Back to top button