पुण्यातील पालकांचं पोरांकडे लक्ष आहे की नाही? आता 14 वर्षांच्या मुलाने टँकरने तिघांना उडवलं
पुणे गेले काही दिवसांपासून चर्चेत आहे. पुणे पोर्शे अपघात प्रकरणानंतर अल्पवयीन मुलांकडून होणारे अपघात या विषय चर्चेत आला आहे. आता पुण्यात आणखी एक अशीच घटना घडली आहे. वानवडी येथे भरधाव टँकरने सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना धडक दिली. तसेच, एका दुचाकी चालक महिलेला देखील धडक दिली. हा अपघात सकाळी साडे सहाच्या सुमारास घडला. धक्कादायक म्हणजे टँकर चालक हा अल्पवयीन आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
टँकरच्या धडकेत झालेल्या अपघातात काही मुलं आणि महिला जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या अपघाताला कारणीभूत ठरलेला टँकर अवघ्या १४ वर्षांचा मुलगा चालवीत होता. नागरिकांनी हा टँकर अडवून धरला असून चालकाला पकडून ठेवले आहे. त्यामुळं परिसरात थोडा गोंधळ निर्माण झाला आहे.
पुण्यात कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर देखील अनेक गंभीर अपघात घडत आहेत. एका हायवा ट्रकने मार्केटयार्ड येथे एका महिलेला चिरडले होते. तसेच, कात्रज येथे एसटी बसच्या धडकेत अभियंता तरुणीचा प्राण गेला होता. उंड्री येथे ट्रक दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका तरुणीला जीव गमवावा लागला होता. एका पाठोपाठ एक असे अनेक अपघात घडत असताना देखील अनेक अल्पवयीन मुले वाहने चालविताना शहरात दिसत आहेत. त्यातच अवजड टँकर अवघ्या १४ वर्षांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
काय घडलं नेमकं?
दुचाकीवरून कुस्ती प्रशिक्षक संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी जात होत्या. त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. त्याचवेळी टँकरची दुचाकीला धडक बसताच त्यांची पत्नी दुचाकीवरून उडून थेट समोर रस्त्यावर पडली. तर, टँकरखाली दोन मुली आल्या. स्वतः ढुमे यांनी प्रसंगावधान राखत या मुलींना बाहेर काढले. त्यानंतर टँकर चालक पळून जावू नये म्हणून नागरिकांनी अल्पवयीन मुलाला पकडून ठेवले. या अपघातात तीन जणांना गंभीर दुखापत झाली आहे.