देश

मोठी बातमी! दिल्ली एअरपोर्टचं छत कोसळलं; अनेक कार चक्काचूर

नवी दिल्लीमधील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजेच IGI विमानतळावरील टर्मिनल 1 वर मोठा अपघात झाला आहे. विमानतळाच्या टर्मिनल 1 चे छत आणि खांब गाड्यांवर कोसळलंय. प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये 4 जण जखमी झाल्यचे समजते. कोसळलेल्या छताच्या मलब्या खालून सर्वांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र अजूनही काही गाड्या छताखाली अडकल्या आहेत. सकाळी साडेपाचच्या सुमारास अग्निशमन विभागाला या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली.

अपघातानंतर विमानतळावर काय परिस्थिती होती यासंदर्भातील एका व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेनं शेअर केला आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या व्हिडीओवरुन अपघाताची दाहकता सहज लक्षात येते. धातूंच्या मोठमोठ्या खांबांखाली कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. या वेगवेगळ्या कारमध्ये अडकलेल्या चौघांना सुखरुप बाहेर काढून उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्ली अग्निशामन दलाने दिली आहे.

 

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे दिल्लीतील अनेक भागातील रस्ते जलमय झाले आहेत. अशातच विमानतळावरील अपघाताच्या बातमीने एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे सध्या दिल्ली विमानतळ अंशतः बंद ठेवण्यात आलेलं आहे, दिल्ली विमानतळावरील टर्मिनल 1 वरून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. विमानतळ प्राधिकरणाकडून तशापद्धतीची माहिती प्रावाशांना दिली जात आहे.

 

“सकाळी साडेपाचच्या सुमारास आम्हाला कॉलवरुन विमानतळावरील छत कोसळल्याची माहिती देण्यात आली. टर्मिनस 1 वर हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर अग्निशामनदलाच्या 3 गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या,” अशी माहिती दिल्ली अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी एएनआयशी बोलताना दिली.

हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र दिल्ली तसेच दिल्ली एनसीआर भागामध्ये गुरुवारी रात्रीपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. वीजांच्या कडकडाटासहीत मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ते जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी बाकी मनस्ताप दिल्लीकरांना सहन करावा लागत आहे. दिल्लीत मान्सून पूर्व पावसामुळे सर्वाधिक तापमान 40 अंश सेल्सिअसखालीच राहिलं.

Related Articles

Back to top button