Maharashtra Weather News : बापरे! ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहणार; राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट
यंदाच्या वर्षी नैऋत्य मान्सून वारे वेळेआधीच देशात आणि राज्यात दाखल झाले. मान्सून दाखल झाल्यानंतर पहिल्या काही दिवसांमध्ये पावसानं अपेक्षित हजेरी लावली. ज्यामुळं महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये शेतीच्या कामांना वेग आला. ज्यानंतर मात्र या पावसानं अशी काही दडी मारली, की मुंबई, ठाण्यासह उत्तर महाराष्ट्रात काही अंशी तापमानवाढ झाल्याचं पाहायला मिळालं. आता मात्र जून महिना शेवटाकडे झुकलेला असतानाच मान्सूननं राज्यात पुनरागमन केल्याचं पाहायला मिळत आहे.
अरबी समुद्रामध्ये मान्सूनच्या वाऱ्यानं पुन्हा जोर धरला असून, हे वारे आता देशभरातील बहुतांश क्षेत्र व्यापताना दिसत आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रातही मान्सूनची (Monsoon Updates) समाधानकारक हजेरी असेल असा अंदाज वर्तवत दक्षिण कोकणात पावसाच्या ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. विदर्भातही वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
वादळी वाऱ्यांचा इशारा…
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंगाद आहे. यादरम्यान, ताशी 40-50 किमी वेगानं वारे वाहण्याचा इशारा हवामान विभागानं देत नागरिकांना सतर्क केलं आहे.
इथं अरबी समुद्रात मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग प्रगतीपथावर असतानाच तिथं बंगालच्या उपसागरातील मान्सूनचे वारे मात्र कमकुवत पडकताना दिसत असून, या भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण दिसत नाहीय, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, मान्सूननं महाराष्ट्र व्यापल्यानंतर आता हे वारे उत्तरेच्या दिशेनं पुढे सरकताना दिसत आहेत. ज्यामुळं उत्तर प्रदेशपासून राजस्थानपर्यंत पावसाची चिन्हं स्पष्ट दिसू लागली आहेत. पुढील 3 ते 4 दिवसात या भागांमध्ये मान्सून आणखी जोर धरणार असल्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.