देश

महालक्ष्मी रेस कोर्सची 120 एकर जागा BMC च्या ताब्यात, दक्षिण मुंबईतल्या इतक्या मोठ्या जागेवर पाहा काय-काय होणार?

 महालक्ष्मी रेस कोर्सची 120 एकर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation)  ताब्यात देण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिलीय. महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागेत सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनसाठी जागा वापरली जाणारेय. 1914 साली रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला (Royal Western India Turf Club) 99 वर्षांच्या लीजवर ही जागा देण्यात आली होती. त्यानंतर हा करार 2013 मध्ये संपुष्टात आला होता. त्यानंतर या जमिनीवर थीम पार्क (Theme Park) उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. या प्रकल्पात थीम पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनर असा समावेश होता. या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली होती.

थीम पार्क उभारण्यासाठी ही जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करणे गरजेचे होते. ही 211 एकर जागा आहे. त्यामध्ये 91 एकर जागा टर्फ क्लबला ठेवण्यात येणार आहे, तर उर्वरित 120 एकर जागा मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित केली जाईल. आतापर्यंत ही जागा लीजवर देण्यात आली होती. आता याठिकाणी मुंबईकरांसाठी सेंट्रल पार्क, गार्डन अन् ओपन स्पेस उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी दिली.

जमिनीच्या विभाजनाशी संबंधित मुद्दे पालिका आणि आरडब्ल्यूआयटीसी यांच्यातील चर्चा आणि परस्पर सामंजस्याने सोडवले गेले. काही किरकोळ समस्या प्रलंबित आहेत, त्याही लवकरच सुटतील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.

रेसकोर्स इतिहासजमा होणार
महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क होणार असल्याने आता घोड्यांच्या शर्यतीची जवळपास 140 वर्षे जुनी परंपरा आता लवकरच भूतकाळात जाण्याची शक्यता आहे. पहिली भारतीय डर्बी  म्हणजे घोड्यांची शर्यत 1943 मध्ये महालक्ष्मी रेसकोर्सवर आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बडोद्याच्या राजाच्या मालकीच्या घोड्याने ही शर्यत जिंकली.

आदित्य ठाकरेंनी साधला निशाणा
दरम्यान, दरम्यान यावरून आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांच्या कॉन्ट्रक्टर मित्रांना हे रेसकोर्स मिळू नये अशी मागणी त्यांनी केलीये. अंडरग्राउंड कार पार्किंगची तिथे गरज नाहीये, जे मोकळ मैदान आहे ते मोकळ मैदान राहायला हवं. क्लबला पण जागा दिली गेली आहे. आम्ही चौकशी करायला सांगणार आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.  रॉयल वेस्टर्न इंडिया  टर्फ क्लबच्या वतीने जे डील केला गेला आहे ते कोणाच्या फायद्यासाठी केला गेला आहे, या सगळ्यावर आम्ही चौकशी लावू आणि जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करू सध्याची आमची मागणी हीच राहील की घटनाबाह्य मुख्यमंत्री  यांच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्राला रेस कोर्सची जागा जाऊ नये  यासाठी आम्ही लढा सुद्धा उभा करू असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Back to top button