शिक्षक मतदारांचा 5 हजार भाव, पाकिटं जप्त; नाशिक विधानपरिषद मतदारसघात राडा, दोघे ताब्यात
लोकसभा निवडणुकांवेळी काही मतदारसंघात पैसे वाटल्याचा आरोप-प्रत्यारोप होत होता. पोलिसांनी काही मतदारसंघातून रोकडही जप्त केली होती. आता, विधानपरिषद निवडणुकांची (Vidhanparishad) रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील 4 विधानपरिषद मतदारसंघात निवडणूक होत असून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी (Election) उद्या मतदाना होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मतदानाची तयारी सुरू असून राजकीय नेतेमंडळी गाठीभेटी व प्रचारात दंग आहेत. दरम्यान, येवल्यात मतदारांना पैसे वाटप करताना पोलिसांनी (Police) उमेदवार विवेक कोल्हे यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे, जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले असताना नाशिकच्या येवल्यात शिक्षकांना मतदानासाठी पैसे वाटप करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निवडणूक विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांनी विठ्ठल नगर परिसरात मतदारांना 5 हजार रुपयांचे पॉकेट देताना कोल्हेंच्या समर्थकांना पकडले आहे. विशेष म्हणजे यावेळी पोलीस देखील उपस्थित होते. पैसे वाटप करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून येवला शहर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे. पैसे वाटप करणारे कार्यकर्ते हे उमेदवार विवेक कोल्हे यांचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे.
2 जण ताब्यात, चौकशी सुरू
शिक्षक मतदार संघाची उद्या निवडणूक होत असून निवडणूकपूर्वी पोलीस आणि तहसील विभागाच्या पथकाने मनमाडला मोठी कारवाई केली आहे. मतदारांना देण्यासाठी तयार करण्यात आले पैशांचे पाकीट पोलिसांनी केले जप्त आहे. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गणेश नगर भागात छापा मारुन पैसे असलेली पाकिटे केली जप्त आहेत. या पाकिटासोबत उमेदवार विवेक कोल्हे यांचे पॉम्लेटही आढळून आले आहेत. याप्रकरणी, दोन जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.
सुषमा अंधारेंनीही केलाय आरोप
नाशिकची निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत आली आहे. येथील मतदारसंघात शिंदे गटाने पैसेवाटप केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तर, महिला मतदारांना नथ आणि पुरुष मतदारांना कपडे वाटत असल्याचा दावा शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी केला होता. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगात तक्रारही दिली आहे. या पार्श्वभूमीवर आता नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणुकीत आचारसंहिता कक्ष अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येत आहे. त्यातच, मतदानाच्या काही तास अगोदरच पैसेवाटप करताना रंगेहात पकडण्यात आलं आहे.
नाशिकमध्ये चौरंगी लढत
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महेंद्र भावसार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे. तर विवेक कोल्हे हे अपक्ष निवडणूक लढवत आहे. नाशिकच्या चौरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.