आता भारतात जवळपास सौरभ नेत्रावळकर हे नाव प्रत्येकाला माहिती झालं आहे. भारतीय वंशाचा असलेला सौरभ अमेरिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट टीमकडून खेळतो. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये त्याने अमेरिकेच्या टीमला विजय मिळवून दिला आणि तो रातोरात स्टार झाला. यानंतर भारताविरूद्धच्या सामन्यात त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीची विकेट घेत पुन्हा स्वतःला सिद्ध केलं. सौरभ सॉफ्टवेअर इंजिनीयर असून प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे की, तो स्वतःचा जॉब आणि खेळ कसा मॅनेज करतो. याचं उत्तर आता त्याची बहिण निधीने दिलंय.
मुंबईत लहानाचा-मोठा झाला सौरभ
सौरभचा जन्म मुंबईमध्ये झाला आहे. सौरभ अमेरिकेच्या क्रिकेट टीमसोबत ओरॅकल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीयर देखील आहे. मात्र, त्याची बहीण निधीच्या म्हणण्यानुसार, खेळाचा विचार करून कंपनीने त्याला कुठूनही काम करण्याचं स्वातंत्र्य दिले आहे. अमेरिकेसाठी क्रिकेटच्या मैदानावर मोलाचे योगदान दिल्यानंतर तो हॉटेलमधून ऑफिसचे काम सांभाळतो.
बहिणीने सांगितली संपूर्ण कहाणी
सौरभची बहीण निधी म्हणाली की, सौरभाला इतक्या पाठिंबा देणाऱ्या व्यक्ती मिळाल्या आहेत. जेव्हा तो क्रिकेट खेळत नसतो तेव्हा त्याला त्याच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करावं लागतं हे त्याला माहीत आहे. अशा परिस्थितीत तो जिथे जातो तिथे तो लॅपटॉप घेऊन जातो. भारतात आल्यावरही तो लॅपटॉप घेऊन येतो.
सौरभने भारतासाठी अंडर-19 वर्ल्ड कपमध्येही सहभाग घेतला होता. पण पुढील शिक्षणासाठी त्याने अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला आणि तो तिथेच स्थायिक झाला. सौरभचं कुटुंबिय अजूनही मुंबईमध्येच राहतं.
अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात भारताने 10 बॉल बाकी असताना 7 विकेट्सने विजय मिळवला. मात्र या सामन्यात सौरभ नेत्रावळकरने उत्तम गोलंदाजी केली. अमेरिकन टीमकडून भारतीय वंशाच्या सौरभ नेत्रावळकरने प्रथम विराट कोहलीला गोल्डन डकचा बळी बनवलं. त्यानंतर रोहित शर्माला अवघ्या 3 रन्सवर माघारी धाडलं. यावेळी त्याने 4 ओव्हर्समध्ये 18 रन्स दिले.
उत्तम गोलंदाजीनंतरही नेत्रावळकर कोणत्या गोष्टीवरून नाराज?
सौरभने टीम इंडियाच्या दोन्ही महत्त्वाच्या ओपनर्सना त्याने माघारी धाडलं. पंत आऊट झाल्यानंतर शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांनी कमान सांभाळली. रनरेटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सूर्याने 13व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर फोर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र नेत्रावळकरने त्याचा कॅच सोडला. टीम इंडियामध्ये सूर्यासोबत अंडर 15 मध्ये सौरभ खेळला होता. तर आता त्याचा झेल सोडल्याची खंत सौरभच्या मनात आहे. सूर्याचा झेल सोडल्यामुळे अमेरिकेचा पराभव झाला असं सौरभला वाटतंय. सूर्याची विकेट गेल्यानंतर टीम इंडियावर दबाव टाकता आला असता, असं सौरभचं म्हणणं आहे.