देश

Success Story: 23 किमोथेरपी देत बेडवरुनच दिली NEET , 2 वर्ष कॅन्सरशी लढलेला मौलिक होणार डॉक्टर

कॅन्सर हे नाव जरी ऐकलं तरी भल्या भल्यांची दाणादाण उडते. त्यामुळेच कोण्या दुष्मनालाही कॅन्सरची लागण होऊ नये असे म्हणतात. मोठ्या फरकाने एखाद्याने सामना जिंकावा अशा रितीने एका मुलाने कॅन्सरला हरवलंय. कारण त्याने केवळ कॅन्सरलाच हरवलं नाहीय तर दुसरीकडे देशातील कठीण मानली जाणारी नीट परीक्षादेखील चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. मौलिक पटेल असे या तरुणाचे नाव असून भल्याभल्यांना जे जमत नाही, अशी नीट परीक्षा त्याने क्रॅक केली. मौलिकला 715 गुण मिळाले. त्याचा केवळ 1 प्रश्न चुकला. छोट्याशा आव्हानांना घाबरणाऱ्यांसाठी ही कहाणी प्रेरणादायी आहे.

नीट 2024 मध्ये मौलिकला 5 गुण कमी मिळाले. असे असले तरी तो एखाद्या नीट टॉपरपेक्षा कमी नाही. कारण ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना अनेक वर्षे वाट पाहावी लागते. मौलिकसाठी 2 वर्षे आयुष्यातील सर्वात कठीण होती. एकीकडे कॅन्सर शरीर पोखरतोय आणि दुसरीकडे मन विचलित होऊ न देता नीटचा अभ्यास करणे हे खूपच आव्हानात्मक होते. त्याच्या या कहाणीबद्दल जाणून घेऊया.

लघवीवेळी वेदना आणि कॅन्सरच निदान
2022 मध्ये माझ्या आयुष्यात खूप मोठं तूफान आलं. हे मला आयुष्यात कधीच विसरता येणार नाही. तेव्हा मी अकरावीला होतो. अचानक लघवीवेळी वेदना होऊ लागल्या. चाचणी केली तेव्हा कळालं ही यूरीनरी ब्लॅडरजवळ 10 सेमीचा ट्युमर आहे. यानंतर बायोप्सी झाली. ज्यामध्ये मला कॅन्सर झाल्याचे कळाले, असे मौलिकने सांगितले.

रोज 3 ते 4 तास किमोथेरपी
मौलिक सांगतो, ‘महिन्याभरात मला माझ्या शरीरात खूप बदल होत असलेले दिसले. यूरीनवेळी खूप वेदना, प्रत्येकवेळी कमजोरी, प्रचंड ताप येऊ लागला. याच्या 1 महिन्यानंतर जून 2022 मध्ये माझे पहिले ऑपरेशन झाले. मग किमोथेरेपीचे सत्र सुरु झाले. मला रोज रुग्णालयात जाऊन 3 ते 4 तास किमोथेरपी करावी लागायची. ऑक्टोबर 2022 पर्यंत 3 किमो झाल्या. सारखा कफ होत होता. केस गळू लागले होते. वेदना तर खूपच होत होत्या.’

ट्युमर 16 सेमी झाला
या प्रोसेसनंतर माझा ट्युमर 4 सेमी राहिला होता. यावेळीच नेमकी माझी नीट परीक्षा जवळ येत होती. नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी मी कोचिंगच्या टेस्ट दिल्या. पण माझा ट्युमर 16 सेमी झालाय हे मला पुढच्या 2-3 महिन्यात कळाले. जानेवारी 2023 मध्ये पुन्हा सर्जरी करण्याची वेळ माझ्यावर आली. त्यावेळी मी बोर्ड परीक्षा किंवा नीट काहीही देऊ शकलो नसल्याचे मौलिकने सांगितले.

काही झाले तरी हार मानायची नाही
दुसरी सर्जरी झाली मग केमोदेखील सुरु झाले. जुलै 2023 पर्यंत 31 रेडिएशन थेरेपी झाल्या होत्या. अखेर डिसेंबर 2023 मध्ये माझी गोळ्या औषधे बंद झाली. पण या सर्व काळात मी शिकण्यापासून दूर गेलो नव्हतो. शाळा-कोचिंगला जाऊ शकत नव्हतो. पण रोज ऑनलाइन अभ्यास सुरु होता. आयुष्यात काही झाले तरी हार मानायची नाही. विजयाबद्दल विचार करु तेव्हाच जिंकू शकू, यावर मी ठाम होतो, असेही मौलिक सांगतो.

आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा
मौलिक हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. तो मुंबईतल्या घाटकोपरमध्ये राहतो. नीट मध्ये मिळालेल्या यशानंतर तो ऑन्कोलॉजिस्ट बनू इच्छित आहे. ज्या आजाराशी लढून तो डॉक्टर बनणार आहे. त्या आजारावर त्याला इलाज करायचा आहे.

Related Articles

Back to top button