‘बाबर आझम म्हणजे काय धोनी नव्हे,’ पाकिस्तानचे माजी खेळाडू भिडले, ‘तुम्ही टोळ्या घेऊन…’
टी-20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली असून, पाकिस्तान संघ सध्या अत्यंत वाईट स्थितीत आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली संघाची वाताहत झाल्याची टीका होत असताना याच मुद्द्यावरुन पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी खेळाडू अहमज शेहजाद (Ahmed Shehzad) आणि इमाम-उल-हक भिडले आहेत. जिओ टीव्हीवरील चर्चेदरम्यान शेहजादला बाबर आझम आपल्या आवडीचे खेळाडू संघात निवडतो का? अशी विचारणा करण्यात आली. यावेळी शेहजादने परखड शब्दांत आपलं म्हणणं मांडलं. तसंच टी-20 वर्ल्डकपसाठी बाबर आझमला कर्णधारपदी कायम ठेवल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही सुनावलं आहे.
“बाबर आझमबद्दल बोलायचं गेल्यास आम्ही चांगले मित्र आहोत. अनेक खेळाडू बराच काळ त्याच्यासोबत आहेत. हे खेळाडू अनेक सामन्यांपासून फॉर्ममध्ये नाहीत. हे फार चांगलं दिसत नाही. जर तुम्ही सामन्यांची संख्या मोजली तर खेळाडू इतका काळ खेळू शकणार नाहीत. दुसऱा एखादा कर्णधार असता तर या खेळाडूंना 35 ते 40 सामन्यांपर्यंत घेऊन गेला नसता,” असं तो म्हणाले.
“आम्ही द्विपक्षीय मालिका जिंकण्यासाठी क्रिकेट खेळत नाही तर आयसीसी स्पर्धा जिंकण्यासाठी खेळतो. गेल्या 4-5 वर्षांत आम्ही एकही स्पर्धा जिंकली का? जर आपण जिंकलो नाही तर मी म्हणेन की टोळ्या, मैत्री आणि एजंट गेल्या 4 ते 5 वर्षांपासून क्रिकेटमध्ये हेराफेरी करत आहेत,” अशी टीकाही त्याने केली.
पाकिस्तानच्या संघात असलेल्या खेळाडूंनी सरफराज अहमदच्या नेतृत्वात पदार्पण केल्याची माहिती शेहजादला सांगण्यात आली तेव्हा तो म्हणाला की, अहमदने 2017 च्या अंतिम फेरीत भारताला पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. पण बाबर कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकू शकलेला नाही.
“त्यांनी [सरफराज अहमद आणि कंपनी] निकाल दिले आहेत. त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. तुम्हीही स्पर्धा जिंका आणि न्याय द्या. एखाद्याला कर्णधार म्हणून इतकी संधी मिळत नाही. एका कर्णधाराला पाच स्पर्धा मिळालेल्या नाहीत. तुला कर्णधारपदावरुन काढून पुन्हा आणण्यात आलं होतं. तुम्ही महेंद्रसिंग धोनी असाल आणि परत आणलं तर समजू शकतो. पम शाहीनसोबत हे चुकीचं केलंत. तुम्ही 2 सामन्यांसाठी कर्णधार करुन त्याला काढून टाकलं,” अशी टीका शेहजादने केली आहे.
पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हक आणि माजी फलंदाज इम्रान नाझीरही या कार्यक्रमाचा भाग होते. इमामला T20 विश्वचषकापूर्वी बाबरकडे पुन्हा कर्णधारपद सोपवण्याच्या पीसीबीच्या निर्णयाबद्दल विचारलं. त्यावर तो म्हणाला की, “बाबरला त्याच्या संमतीशिवाय काढून टाकण्यात आले आणि त्याच्या संमतीशिवाय पुन्हा नियुक्त केले. बोर्डाने त्याला पुन्हा कर्णधार म्हणून नियुक्त केले. 2021 मध्ये, आम्ही उपांत्य फेरीत पोहोचलो. याचा अर्थ खेळाडू चांगलं खेळत होते. आपण जिंकू शकलो नाही यावर चर्चा होऊ शकते. बाबरला असे अनेक खेळाडू आवडतात असे तुम्ही म्हणू शकता पण त्याला मैत्री म्हणणे अगदी वैयक्तिक आहे”. याचवेळी इमाम आणि शेहजाद यांच्यातील वादाला सुरुवात झाली.
शेहजादने म्हटलं की, “इमाम करारात आहे, तरुण आहे हे मी समजू शकतो. त्याच्या वयात असताना आम्हीही तसंच बोलत होतो. मी 34 वर्षांचा आहे आणि अशा गोष्टींनी कंटाळलो आहे. आम्हाला गोष्टी चांगल्या व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे. जेव्हा तुम्ही खेळाडूंना 4 ते 5 वर्षं असंच ओढत नेता तेव्हा देशांतर्गत चांगलं खेळणाऱ्या खेळाडूंवर अन्याय करता. कोणीतरी त्यांचे अधिकार हिरावून घेत असतं”.
यावर इमाम-उल-हकने म्हटलं की, मीदेखील सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे. मी गेल्या 6-7 वर्षांपासून खेळत आहे. पण मी तुम्हाला वचन देतो की जेव्हा मी 36 वर्षांचा होईन तेव्हाही माझी भूमिका तशीच असेल. जर कोणाला काही समस्या असेल तर, ते 28 वर्षांचे असतानाही तेच बोलू शकतात, तुम्ही असे का म्हणत नाही?”