अपराध समाचार

Pune Porsche Accident: पुण्याच्या आमदाराचा फोन आला अन् डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलले?

पुणे पोर्शे अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत असताना पोर्शे कारने दोघांना चिरडले यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा रक्ताच्या नमुन्यांचा रिपोर्ट बदलण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर अजय तावरे याला रक्ताचा नमुना बदलण्यास पुण्यातील एका आमदाराचा फोन आल्याचे समोर आले आहे.

डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर यांनी त्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने कचऱ्याच्या पेटीत टाकले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते. डॉ. अजय तावरे यांच्या सांगण्यावरुन डॉ. श्रीहरी हलनोर यांनी हे रक्ताचे नमुने बदलले. पहिल्या सॅम्पलमध्ये अग्रवालच्या अल्पवयीन मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. यानंतर पोलिसांनी दुसऱ्यांदा ब्लड सॅम्पल घेत औंधमधील सरकारी रुग्णालयात दिले होते. औंध रुग्णालयात वडील आणि मुलगा दोघांचे नमुने पाठवण्यात आले होते. त्या ठिकाणी विशाल अग्रवाल आणि अल्पवयीन मुलाचे सॅम्पल मॅच झाले. पण ससूनमधील रक्ताचा अहवाल मॅच झाला नाही. त्यानंतर पुणे पोलिसांनी डॉ. श्रीहरी आणि अजय तावरेला अटक केली आहे.

अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी कोणी दबाव टाकला होता. याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्ताचा नमुना बदलण्यास डॉक्टर अजय तावरे याला पुण्यातील एका आमदाराचा फोन आला होता. या प्रकरणी आता पोलिस खोलात जाऊन तपास करणार आहेत. हे आमदार कोण आहेत व कोणी दबाव टाकला हे मात्र अद्याप समोर आलेले नाहीये.

पुण्यातील एक बडा नेता या प्रकरणातील आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे तसंच, या प्रकरणी हस्तक्षेप करत आहे, असे आरोप यापूर्वीदेखील करण्यात आले होते. वेगवेगळ्या पक्षांकडूनही असे आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी एका आमदारानेच फोन केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिस अधिक खोलात जाऊन तपास करणार आहेत.

Related Articles

Back to top button