Search
Close this search box.

Dombivli MIDC Blast: केमिकलच्या वाफेमुळे हवेत दुर्गंधी, उद्ध्वस्त ढिगाऱ्यांच्या बाजूला मृतदेहांचे तुकडे, डोंबिवली MIDC मधील भीषण दृश्य

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डोंबिवलीतील एमआयडीसीमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण स्फोटाची दाहकता आता समोर येताना दिसत आहे. येथील अमुदान कंपनीतील बॉयलरचा स्फोट (Dombivli MIDC Blast) झाल्याने ही दुर्घटना घडली होती. तब्बल दोन ते तीन किलोमीटर परिसरात या स्फोटाचे हादरे बसले होते. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला होता तर जवळपास 60 जण जखमी झाले होते. काल याठिकाणी आगाची धग आणि धुराचे साम्राज्य असल्याने फारसे शोधकार्य करता आले नव्हते. मात्र, आज दुसऱ्या दिवशी सकाळीच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (NDRF) पथके डोंबिवली एमआयडीसीत दाखल झाली आहेत. त्यांच्याकडून शोधकार्य सुरु असताना या स्फोटाची दाहकता समोर येत आहे.

एनडीआरएफच्या पथकांनी शुक्रवारी सकाळी शोधकार्याला सुरुवात केली तेव्हा अमुदान कंपनीच्या परिसरातच ढिगाऱ्याखालून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर शेजारील के.जी. कंपनीच्या आवारात आणखी एक मृतदेह मिळाला. तर स्फोटाने बेचिराख झालेल्या परिसरात भयावह दृश्य पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मृतदेहांचे अवशेष विखुरले आहेत. हे तुकडे एकाच मृतदेहाचे आहेत की नाही, याचा मेळ लावणेही अवघड होऊन बसले आहे. एनडीआरएफच्या पथकाकडून मृतदेहाचे मिळतील ते भाग जमा करुन रुग्णालयात ओळख पटवण्यासाठी पाठवले जात आहेत.

याठिकाणी आणखी काही मृतदेह असण्याची शक्यता एनडीआरएफच्या पथकाकडून व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने ढिगाऱ्याखाली शोध घेतला जात आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.

हवेत रसायनांची वाफ, श्वास घेणेही धोकादायक
एमआयडीसीच्या फेज 2 मध्ये हा स्फोट झाला त्या भागात रंग तयार केले जातात. त्यासाठी विविध प्रकारची रसायनं वापरली जातात. यापैकी बहुतांश रसायने ही विषारी असतात. काल आग लागल्यामुळे ही रसायनेही जळाली. त्यामुळे आता येथील हवेत रसायनांची वाफ पसरली आहे. त्यामुळे या भागात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. एनडीआरएफच्या जवानांना याठिकाणी मास्क लावून वावरावे लागत आहे. अग्निशमन दलाकडून याठिकाणी धूर कमी करण्यासाठी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.

admin
Author: admin

और पढ़ें