‘अजित पवारांचे ‘फंटर’ आमदार टिंगरे त्या बेवड्या मुलास..’; पोर्शे अपघातावरुन ठाकरे गटाचा टोला
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे गाडीच्या अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरुन राजकीय चिखलफेकही सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आरोपींना वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामुळेच सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. या दुर्घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात येऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन कठोर कारवाईचे आदेश दिले. मात्र या प्रकरणामध्ये एक स्थानिक आमदार राजकीय दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात आला. सोशल मीडियावरील या दाव्यानंतर अजित पवार गटाचे वडगावशेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी सोशल मीडियावरुन आपली बाजू स्पष्ट केली होती. आपण पोलीस स्टेशनला गेलो होतो मात्र कोणत्याही प्रकारे राजकीय दबाव टाकला नाही असा दावा टिंगरे यांनी केला आहे. मात्र आता टिंगरे यांच्या कथित सहभागाच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.
कारवाई करणार असं फडणवीस म्हणाले
19 मे रोजी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडल्यानंतर मतदारसंघात मोठा अपघात झाल्याचं समजल्याने माहिती घेण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला गेल्याचा दावा टिंगरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. या प्रकरणात राजकीय दबाव टाकला जात असल्याच्या संदर्भ देत फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीस यांनी कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर योग्य कारवाई केली जाईल असं म्हटलं होतं. दरम्यान या घटनेनंतर अल्पवयीन चालकाला बालन्यायालय मंडळाने आधी जामीन मंजूर केल्यावरुन बराच गदारोळ झाल्यानंतर त्याचा जामीन रद्द करण्यात आला.
राऊत यांनी साधलेला निशाणा
पुण्यात ही दुर्घटना घडल्यानंतर टिंगरे ज्या तत्परतेने पोलीस स्टेशनला हजर राहिले त्यावरुन उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी निशाणा साधला. “पुण्याच्या पोलीस आयुक्तांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे. पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली? दोन निष्पाप जीवांचे बळी गेले. एक माजोरडा, दारुडा असा तरुण मुलगा जो बिल्डरचा मुलगा आहे तो दारु पित असल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. तुम्ही काय रिपोर्ट दिला आहे. भ्रष्ट पोलीस आयुक्त, पोलीस यंत्रणा आणि तितकाच भ्रष्ट एक आमदार,” अशी टीका संजय राऊतांनी केली होती. तसेच पुढे बोलताना, “अजित पवार गटाचे आमदार तशेच वागणार, हे माणुसकीशून्य लोक आहेत. बाजूला दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पोलीस ठाण्यात पिझ्झा, बर्गर खायला घालत आहात. खोटा मेडिकल रिपोर्ट देत आहात.अशा लोकांवर पुणेकरांनी सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. असे पोलीस आयुक्त पुण्याला लाभले हा कलंक आहे,” अशी टीका संजय राऊतांनी केली.
एका अप्रामाणिक व्यक्तीस वाचविण्यासाठी…
आज ठाकरे गटाने पुन्हा एकदा या प्रकरणावरुन अजित पवार गटाचे आमदार असलेल्या टिंगरे यांचा थेट उल्लेख न करता निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अप्रामाणिक वागण्यामुळे देशातील अप्रमाणिकपणा वाढत असल्याची टीका ‘सामना’च्या अग्रेलाखातून करण्यात आली आहे. याच अग्रलेखामध्ये पुण्यातील अपघाताचा संदर्भ देत निशाणा साधण्यात आला आहे. “पुण्याच्या रस्त्यावर एका मद्यधुंद तरुणाने तरुण-तरुणीस त्याच्या भरधाव गाडीने उडवले. त्या मद्यधुंद तरुणास वाचवण्यासाठी पोलिसांनी त्याच्या रक्ताचे सँपल बदलले व अजित पवारांचे ‘फंटर’ आमदार टिंगरे त्या बेवड्या मुलास वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनात गेले. एका अप्रामाणिक व्यक्तीस वाचविण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच भ्रष्ट व अप्रामाणिक करण्याचे उद्योग मोदींच्या अमृत काळात वाढले. कारण आपले कोण काय बिघडवणार? ही मस्तवाल वृत्ती पोसली जात आहे. देशातले सर्व भ्रष्ट व अप्रामाणिक लोक मोदी यांनी त्यांच्या घरात घेतले आहेत,” असा निशाणा ठाकरे गटाने साधला आहे.
टिंगरे कनेक्शन काय?
पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी टिंगरे हे मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये बसून असल्याचा आरोप केला. टिंगरे यांचे अग्रवाल यांच्याशी व्यवसायिक हितसंबंध असल्याचाही दावा करत सोशल मीडियावरुन बरेच दावे करण्यात आले.