मुंबईकरांना हवामान विभागाचा अलर्ट; ताशी 50 KM वेगाने वारे वाहणार, तुफान पाऊस पडणार
मुंबईकरांनी मोठ्या वादळाचा सामना केला आहे. भर दिवसा मुंबईत काळोख पडला होता. तुफान वारा वाहत होता. यानंतर पाऊस देखील पडला आहे. हवामान विभागाने मुंबईकरांना अलर्ट जारी केला आहे.
पुढील 3 ते 4 तास मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत प्रतितास 40 ते 50 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने वारे पाहणार आहेत. हवामान विभागाने हा अलर्ट जारी केला आहे. मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत भर दुपारी काळोख पडला
मुंबईमध्ये भरदुपारी काळोख पडला आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. मुंबईसह उपनगरांतही जोरदार पाऊस पडतोय. दादर सायन माटुंगा कुर्ला परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचं पहायला मिळालं… मुंबईत अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान मुंबईत दोन दिवसांपासूनच वातावरणात बदल झालाय, ढगाळ वातावरण निर्माण झालंय. मुंबई शहर तसंच उपनगरात असह्य उकाडा जाणवतोय. ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये बुधवारपर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती.
विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट
नागपूर,यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीत आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.. यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीत वादळी वा-यासह मुसळधार पाऊस होईल तसंच गारपिटीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशक हवामान विभागाकडून पूर्व आणि पश्चिम विदर्भासाठी हा इशारा देण्यात आलाय. दरम्यान आज सकाळपासून नागपुरातही ढगाळ वातावरण आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला अवकाळीने झोडपलं
सिंधुदुर्ग जिल्ह्याला सलग दुस-या दिवशी अवकाळीने झोडपलं. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झालाय. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र, शेतकरी हवालदिल झालेत.