देश

क्रिकेट खेळताना गुप्तांगाला बॉल लागून चिमुकल्याचा मृत्यू; पुण्यातील घटना CCTV त कैद

पुण्यात एक विचित्र घटना घडली आहे. येथील लोहगावमध्ये क्रिकेट खेळताना गुप्तांगाला बॉल लागल्याने एका चिमुरड्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या विचित्र दुर्घटनेमध्ये प्राण गमावलेल्या चिमुकल्याचं नाव शौर्य ऊर्फ शंभ कालिदास खांदवे असं आहे. शौर्यला बॉल कसा लागला, नेमकं काय घडलं हे सारं मैदानावर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.

नेमकं घडलं काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या शाळांना उन्हाळी सुट्टी असल्याने इतर मुलांप्रमाणे शौर्यसुद्धा त्याच्या मित्रांबरोबर सायंकाळी क्रिकेट खेळत होता. शौर्य गोलंदाजी करत असताना त्याच्या मित्राने सरळ त्याच्या दिशेने एक चेंडू टोलवला. अत्यंत वेगाने हा चेंडू शौर्यच्या दिशेने आला आणि त्याला कंबरेखालील भागात गुप्तांगाजवळ लागला. शौर्यला काही कळण्याआधीच हा सारा प्रकार घडला आणि तो उभ्या जागीच खाली पडला. शौर्य क्षणात खाली कोसळल्याचं पाहून सर्व मित्र घाबरले. मात्र काही वेळाने कसाबसा तो उठला. पण पुन्हा त्याला असह्य वेदान होऊ लागल्याने तो चक्कर आल्याप्रमाणे खाली पडला. ही घटना लोहगावमधील जगद्गुरू पोर्ट्स अकॅडमी मैदानात घडली. तो दुसऱ्यांदा खाली पडताच त्याच्याबरोबर खेळणारी मुलं फारच घाबरली.

शौर्यला रुग्णालयात दाखल केलं पण…
शौर्यबरोबर खेळणाऱ्या मुलांनी आरडाओरड सुरु केली. त्यानंतर तिथे काही लोक गोळा झाले. मुलांनी घडलेला सारा प्रकार त्यांना सांगितला. तातडीने शौर्यला जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. रुग्णालयात नेत असतानाच शौर्य बेशुद्ध पडला. इमारतीमधील लोकांनी शौर्यला रुग्णालयामध्ये नेलं असता तिथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. मात्र डॉक्टरांनी शौर्यला ब्रॉट डेड म्हणजेच रुग्णालयात मृतावस्थेत आणल्याचं जाहीर करत त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. शौर्यच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर सर्वांना धक्काच बसला. शौर्यच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. काही तासांपूर्वी हसत खेळत घरातून खाली क्रिकेट खेळायला गेलेला शौर्य आपल्याला कायमचा सोडून गेला आहे यावर घरच्यांचा विश्वासच बसत नाहीये. शौर्यच्या मित्रांनाही या घटनेचा मोठा मानसिक धक्का बसला आहे. लहान मुलांना खेळायला पाठवताना पालकांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. मात्र शौर्यबरोबर जो प्रकार घडला असे प्रकार फारच क्वचित घडतात.

पोलिसांनी घेतली दखल; आकस्मिक मृत्यूची नोंद
याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही तपासलं असून यामध्ये काहीही गैरप्रकार घडल्याचं आढळून आलेलं नाही. खेळताना झालेल्या अपघातामध्ये शौर्यला प्राण गमावावे लागले.

Related Articles

Back to top button