देश

नोकरीत मन रमलं नाही म्हणून गाढवं पाळली, आता महिन्याला करतोय 3 लाखांची कमाई; सांगितली पैसे कमावण्याची आयडिया

गाढवाला सुरुवातीपासूनच कष्टाचं काम करणारा प्राणी म्हणून वापरलं जात आहे. अनेकदा त्याचा वापर फक्त मालवाहतूक करण्यासाठीच केला जायचा. याशिवाय गाढवाचं दूध हे गुणकारी मानलं जातं. लहान बाळांना हे दूध पाजलं जातं. विशेष म्हणजे गाढवाचं दूध सामान्य दुधाच्या तुलनेत 70 पट जास्त किंमतीला विकलं जातं. गुजरातच्या धीरेन सोलंकी याने तब्बल 42 गाढवं पाळली आहेत. दक्षिणेकडील राज्यांतील ग्राहकांना गाढवांचे दूध पुरवठा करत तो महिन्याला 2 ते 3 लाख रुपये कमावत आहे.

धीरेन सोलंकी आधी सरकारी नोकरीच्या शोधात होता. त्याने सांगितलं की, “मला काही खासगी कंपनीत नोकऱ्या मिळाल्या होत्या. पण त्यातून माझा खर्च भागत नव्हता. याचदरम्यान मला दक्षिण भारतात गाढव पालनाची माहिती मिळाली. मी काही लोकांची भेट घेतली आणि 8 महिन्यांपूर्वी येथे शेत उभारलं”. धीरेनने सुरुवातीला 20 गाढवं विकत घेतली. यासाठी त्याने 22 लाखांची गुंतवणूक केली.

धीरेनसाठी सुरुवीताचा काळ कठीण होता. गुजरातमध्ये गाढवाच्या दुधाला तितकीशी मागणी नव्हती. त्यामुळे सुरुवातीचे 5 महिने धीरेन काहीच कमाई करु शकला नाही. यानंतर त्याने दक्षिणेतील काही कंपन्यांना भेट दिली जिथे गाढवाच्या दुधाची मागणी होती. आता तो कर्नाटक आणि केरळात दूध पुरवठा करत आहे. यामध्ये काही कॉस्मेटिक कंपन्याही आहेत, ज्या गाढवाच्या दुधाचा वापर आपल्या प्रोडक्टमध्ये करतात.

धीरेनला दुधाच्या दराबाबत विचारण्यात आलं असता, 5 ते 7 हजार लिटर दराने विकत असल्याची माहिती दिली. दरम्यान म्हशीच्या दुधासाठी लिटरला 65 रुपये मोजावे लागतात. हे दूध ताजं राहावं यासाठी फ्रिजरमध्ये ठेवलं जातं. दूध वाळवून पावडरच्या स्वरूपातही विकले जाते, ज्याचा भाव किलोला सुमारे एक लाखापर्यंत जातो.

धीरेन सोलंकीकडे 42 गाढवं असून, त्यांच्यासाठी 38 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. आपण राज्य सरकारकडून कोणतीही मदत घेतलेली नाही, पण त्यांनी या क्षेत्रावरही लक्ष केंद्रीत करावं असं आवाहन त्याने केलं आहे.

गाढवाच्या दुधाचे फायदे काय?
प्राचीन काळी गाढवाच्या दुधाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता, काही दाव्यांनुसार इजिप्शियन राणी क्लियोपात्रा त्यात स्नान करत असे. वैद्यकशास्त्राचे जनक, ग्रीक वैद्य हिप्पोक्रेट्स यांनी यकृताच्या समस्या, नाकातून रक्त येणे, विषबाधा, संसर्गजन्य रोग आणि ताप यासाठी गाढवाचे दूध सुचवलं होतं.

इतके फायदे असूनही आधुनिक काळात गाढवाच्या दुधाचं प्रमाण कमी झालं आहे. शास्त्रज्ञांनी त्याच्या क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केल्या आहेत. दरम्यान गाढवाचं दूध फार प्रमाणात उपलब्ध नसल्याने त्यासाठी जास्त किंमत मोजावी लागते.

अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमधील अहवालानुसार, गाढवीच्या दुधाची रचना गायीच्या दुधाच्या तुलनेत मानवी दुधासारखी असते आणि लहान मुलांसाठी, विशेषत: ज्यांना गाईच्या दुधाची ऍलर्जी आहे त्यांच्यासाठी ते उत्तम पर्याय बनवते.

“गाढवाच्या दुधाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आतड्यांसंबंधी मायक्रोफ्लोराचे नियमन करण्याची क्षमता त्याच्यात आहे,” असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. रोगप्रतिकारक शक्ती आणि मधुमेह विरोधी गुण वाढवण्यासाठी त्याचे फायदे दर्शविणारे अभ्यास देखील आहेत. गाढवाच्या दुधाचं आयुष्यमान जास्त असतं. त्यामध्ये दुधाच्या इतर प्रकारांमध्ये आढळणारे अनेक रोगजनक नसतात.

Related Articles

Back to top button