Maharashtra Weather: राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाचा अंदाज; मुंबईत कसं असणार तापमान?
राज्यात आता सर्वच ठिकाणी कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. मात्र काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह पाऊसही पडतोय. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि उष्णतेची लाट दिसून येतेय. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आणखी काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे. पुढील ७ दिवस राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील बहुतांश भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
काही भागांमध्ये पावसाची शक्यता
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 21 आणि 22 एप्रिल रोजी कोकण गोव्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज आहे. आगामी पाच ते सात दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यातच विदर्भातील कमाल तापमानात पुन्हा एकदा मोठी वाढ झालीये.
सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापर, नगर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत कसं राहणार तापमान?
मुंबईसह किनारपट्टी भागात तापमानात घट दिसून आल्याचं पहायला मिळतंय. यामुळे वाढत्या उकड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सरासरी कमाल तापमान 34 अंशांवर राहिलं आहे. तर मध्य महाराष्ट्रात सरासरी 39 तर मराठवाडा आणि विदर्भात कमाल पारा सरासरी 42 अंश सेल्सिअस नोंद झाली आहे. मात्र मुंबईमध्ये काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.