साताऱ्याचा उमेदवार ठरला? पृथ्वीराज चव्हाण नाही तर शरद पवार गटाचा ‘हा’ बडा नेता उदयनराजेंंविरोधात लढणार
भाजपने अधिकृत घोषणा केली नसली तरी साताऱ्यातून उदयनराजे भोसले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित झाले आहे. साताऱ्यात महाविकास आघाडीतर्फे कोण उदयनराजेंना टक्कर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण हे उदयनराजे भोसले यांच्याविरोधता लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता पृथ्वीराज चव्हाण नाही तर शरद पवार गटाचा बडा नेता उदयनराजे भोसले यांच्याविरोधता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार ठरला आहे. महाविकासआघाडीतर्फे शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
शशिकांत शिंदे 15 एप्रिल रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे. महायुतीच्या उमेदवारा विरोधात तगडा उमेदवार देण्यावरुन हालचाली झाल्या होत्या. उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्या निवडणुकीचा थेट सामना होण्याची चिन्ह आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांचा खुलासा
मविआतर्फे साता-यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साता-यातून उमेदवारीच्या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. मात्र, तसा प्रस्ताव आल्यास विचार करू असंही ते म्हणाले होते. जयंत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाणांची त्यांच्या घरी भेट घेतली होती. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण साता-यातून उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, पृथ्वीराज चव्हाणांनी खुलासा करत सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला. साता-यातील जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सुटली आहे. यामुळे शरद पवारांनी येथे सक्षम उमेदवार द्यावा असंही चव्हाण म्हणाले होते.
साता-यातून महायुतीकडून लोकसभा लढवण्यासाठी उदयनराजे भोसले इच्छुक
साता-यात आज महायुतीचे तीन मेळावे होतायत..कराड, वाई आणि शेंद्रे इथे महायुतीचे मेळावे होतायत. मात्र अजूनही साता-यात महायुतीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. साता-यातून महायुतीकडून लोकसभा लढवण्यासाठी उदयनराजे भोसले इच्छुक आहेत. त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शाहांची भेट घेतली होती. मात्र अजूनही साता-याची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे मेळाव्यांचा सपाटा सुरु झाला असला तरी प्रचार कुणाचा करायचा हा प्रश्न महायुतीच्या कार्यकर्त्यांसमोर आहे.