Gaganyan Mission: 0.5 सेकंद शिल्लक असतानाच गगनयान मिशनचं लाँचिंग रद्द! इस्रोनं सांगितलं खरं कारण
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) गगनयान मिशनचं लाँचिंग रद्द करण्यात आलं आहे. उड्डाणासाठी फक्त 5 सेकंद शिल्लक असताना हे लाँचिंग थांबवण्यात आलं. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी यावेळी इंजिनमधील इंधनाने पेट न घेतल्याने गगनयानचं लाँचिंग रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. त्यापूर्वी हवामानामुळे 8 वाजता होणारं लाँचिंग पुढे ढकलण्यात आलं होतं. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अतंराळ केंद्रातून गगनयानच्या क्रू मॉड्यूलचं लाँचिंग होणार होते. पण हे लाँचिंग आता टळलं आहे.
इस्रो प्रमुखांनी हे मिशन रद्द करण्यात आल्याची माहिती देताना, नेमकी काय चूक केली याची माहिती घेत असल्याचं सांगितलं आहे. “टेस्ट व्हेईकल पूर्णपणे सुरक्षित आहे. इंजिन इग्निशन झालं नाही. नेमक्या काय चुका झाल्या याचं विश्लेषण इस्रो करणार असून, त्या दुरुस्त केल्या जातील. काही कारणास्तव स्वचलित लाँचमध्ये बाधा आली, संगणकाने लाँचिंग रोखलं. आम्ही मॅन्यूअल पद्धतीने चुकांचं विश्लेषण करु,” असं इस्रो प्रमुख म्हणाले.
याला टेस्ट व्हेईकल अबॉर्ट मिशन-1 (Test Vehicle Abort Mission -1) म्हटलं जात होतं. तसंच याला टेस्ट व्हेईकल डेव्हलपमेंट फ्लाइंट (TV-D1) असंही बोललं जात होते. आज जर याचं लाँचिंग झालं असतं तर, टेस्ट व्हेईकल अंतराळवीरासाठी तयार करण्यात आलेल्या क्रू मॉड्यूलला आपल्यासह अवकाशात घेऊन गेलं असतं. हे रॉकेट क्र्यू मॉड्यूलला घेऊन साडे सोळा किमी वर गेल्यानंतर बंगाल खाडीत लँड करणार होतं.