मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलमुळे सागरी व्यापार वाढणार, तरुणांना हजारो नव्या रोजगाराच्या संधी
Mumbai International Cruise: जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडून मुंबईजवळ पालघरमधील वाढवण येथे बंदर बांधण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. यासाठी 61 हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
वाढवण येथील बंदर तयार करण्यासाठी 3 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला असून बंदरात प्रत्येकी 1 किलोमीटरचे एकूण 9 टर्मिनल असतील, अशी माहिती ट्रस्टकडून देण्यात आली आहे.
जेएनपीटीनंतर बंदर पूर्ण झाल्यामुळे राज्याला आर्थिक फायदा तर होणार आहे. यासोबतच हजारो नवीन रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.
भारत लवकरच जगातील क्रूझ हब होणार आहे, मुंबईत उभारल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलचे यात मोठे योगदान असणार आहे.
पंतप्रधानांनी 23 हजार कोटी रुपयांच्या सागरी प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे. यावेळी त्यांनी ब्लू इकॉनॉमीची दीर्घकालीन ब्लू प्रिंट जारी केली. सुमारे 4,500 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणार्या टुना-टेकरा टर्मिनलची पायाभरणी गुजरातच्या दीनदयाळ बंदर प्राधिकरणात करण्यात आली आहे.
हे ग्रीनफिल्ड टर्मिनल सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) प्रक्रियेअंतर्गत विकसित केले जाणार आहे. पंतप्रधान मोदींनी सागरी क्षेत्रातील जागतिक आणि राष्ट्रीय भागीदारीसाठी सुमारे 7.16 लाख कोटी रुपयांचे 300 हून अधिक सामंजस्य करार (एमओयू) केले.
मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल 2024 पर्यंत प्रवाशांसाठी तयार होईल. या टर्मिनलवर दरवर्षी सुमारे 200 क्रूझ जहाजे येतील. त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
सध्या राज्यात मुंबईतील मुंबई बंदर आणि नवी मुंबईत जेएनपीटी बंदर अशी दोन बंदरे आहेत. शहरापासून जवळच असल्याने मुंबई बंदरातून होणारा व्यापार खूपच कमी झाला आहे.
महाराष्ट्राला सुमारे 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. समुद्रकिनाऱ्याचा योग्य वापर करून व्यापाराला चालना देण्याबरोबरच वाहतुकीसाठी नवीन मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे.