कानठळ्या बसणारा आवाज झाला अन् मुंबई गोवा महामार्गावरील पूल मधोमध तुटला
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. मनसे (MNS) मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावरुन आक्रमक झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातत्याने या रस्त्याच्या कामाची पाहणी सुरू ठेवली आहे. मात्र आता या बांधकामाच्या दर्जाबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. चिपळूणमध्ये (Chiplun) मुंबई गोवा महामार्गावच्या उड्डाणपुलाचा भाग कोसळल्याने खळबळ उडाली आहे.
चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावरच्या उड्डाण पुलाचा भाग तुटला आहे. चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यावरील पुलाचा भाग मधोमध तुटल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी आठ वाजता पुलाचा भाग मधोमध तुटल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेत अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे समोर आलं आहे. मात्र बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भाग मधोमध तुटल्याने त्याच्या कामाच्या दर्जाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.