देश

पटोलेंकडून कुणाल पाटलांवर काल लोकसभेची जबाबदारी, आज जवाहर शेतकरी सूतगिरणीवर तपास यंत्रणेचा छापा, धुळ्यात खळबळ

केंद्र आणि राज्यात असलेल्या सत्तेचा गैरवापर करुन आपल्या विरोधकांवर भाजपाकडून ईडीसह इतर यंत्रणांचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून कायमच करण्यात येतो. धुळे ग्रामीणचे काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा म्हणून याआधी त्यांना गळाला लावण्याचेही प्रयत्न झाल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येते. आमदार कुणाल पाटील यांच्याकडे नऊ वर्षांपासून सूतगिरणीचे अध्यक्षपद आहे. धुळे तालुक्यातील मोराणे शिवारात ही सूतगिरणी आहे.

आज पहाटे पोलीस यंत्रणेसह धडकलेल्या नाशिक येथील एका तपास यंत्रणेच्या ताफ्यामुळे जवाहर सूतगिरणीत खळबळ उडाली. हे पथक नेमक्या कोणत्या विभागाचे, याबद्दल कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे.

या पथकातील काही अधिकाऱ्यांनी सूतगिरणीच्या आत मध्ये प्रवेश करतानाच मुख्य गेटवर असलेल्या सुरक्षा रक्षकांचे मोबाईल ताब्यात घेत त्या ठिकाणचे सर्व टेलिफोनचे कनेक्शन कट केल्याची माहिती सुरक्षारक्षकांकडून देण्यात आली. तसेच सूतगिरणीचे व्यवस्थापकांच्या निवासस्थानीही तपासणी केल्याचे म्हटले जात आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच आमदार कुणाल पाटील यांच्याकडे विदर्भातील अमरावती, नागपूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. धुळे जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघातून काँग्रेसतर्फे निवडून आलेले कुणाल पाटील हे एकमेव काँग्रेसचे आमदार आहेत.

आमदार कुणाल पाटील यांची प्रतिक्रिया…

जवाहर सूतगिरणीवर कोणत्या तपास यंत्रणेने छापा टाकला, याची मला कल्पना नाही. जवाहर सूतगिरणी मध्ये असलेली सर्वच संपर्क यंत्रणा बंद करण्यात आली असून या संदर्भात आपणास या क्षणापर्यंत काहीही कल्पना नाही, असं कुणाल पाटील म्हणाले. या जवाहर सूतगिरणीचे लेखापरीक्षण झाले असून त्यात कुठलाही दोष आढळून आलेला नाही. या छाप्यामागे राजकीय हेतू असेल असा दावा आपण ठोस काही कळल्याशिवाय करु शकत नाही, असंही ते म्हणाले.

Related Articles

Back to top button