Maharashtra Rain : आजचा दिवस पावसाचा, ‘इथं’ यलो अलर्ट; पाहा कोणत्या भागावर होणार कृपा
वारंवार उघडीप देणाऱ्या पावसानं आता पुन्हा एकदा जोर धरण्यास सुरुवात केली असून, पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकणात तर पावसाची संततधार सुरुच आहे. पण, आता तो मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही चांगला जोर धरताना दिसेल. तर, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तिथं राज्याच्या पश्चिमेला असणाऱ्या घाटमाथ्यावरील परिसरातही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
मुंबईतही बहुतांशी पावसाचे ढग शहरावर सावट आणताना दिसतील. तर, शहराच्या काही भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरींची हजेरी पाहायला मिळत आहे. त्यामुळं नागरिकांनी पावसाच्या तयारीनिशी घराबाहेर पडावं आणि विशेष खबरदारी बाळगावी असं आवाहनही करण्यात आलं आहे. तिथं कोकणात पावसानं पुन्हा जोर धरल्यामुळं शेतं पुन्हा बहरली असून, उर्वरित राज्यातही असंच चित्र पाहायला मिळत आहे.