LPG Price Cut: सामान्य नागरिकांना मोठा दिलासा! घरगुती गॅस सिलेंडर 200 रुपये स्वस्त, पाहा बदलेले दर
रक्षाबंधनाच्या एक दिवसपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने देशभरातील गृहिणींना मोठी भेट दिली आहे. मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची मोठी कपात जाहीर केली आहे. यासोबतच ७५ लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार असेही जाहीर केले. या निर्णयामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अलीकडच्या काळात गगनाला भिडलेल्या महागाईमुळे जनतेच्या अडचणी वाढल्या होत्या, मात्र आता सरकारच्या या निर्णयाने सामान्य जनतेला थोडा दिलासा मिळेल.
केंद्राची घोषणा
३३ कोटी ग्राहकांसाठी २०० रुपयांनी सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. उज्ज्वला योजनेतील ग्राहकांसाठी ४०० रुपयांनी दर कमी करण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं ओनम आणि रक्षाबंधनाच्या निमित्तानं हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर सध्या दिल्लीत ११०३ रुपये, कोलकाता ११२९ रुपये, मुंबईत ११०२ आणि चेन्नईत १११८.५० रुपये आहेत.
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दुहेरी लाभ
मोदी सरकारच्या या घोषणेनंतर आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांना २०० रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळेल. उज्जवला योजनेत आधीच अनुदान म्हणून २०० रुपयांचा लाभ दिला जातो. अशा प्रकारे आता त्यांना ४०० रुपये सबसिडी दिली जाईल.
घरगुती गॅस सिलेंडरचे नवीन दर
राजधानी दिल्लीत सध्या अनुदानाशिवाय घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ११०३ रुपये असून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात ४०० रुपये मिळतील. म्हणजेच त्यांना सिलिंडरसाठी ७०३ रुपये मोजावे लागणार आहेत. तर सामान्य ग्राहकांसाठी दिल्लीत गॅस सिलिंडरची किंमत ९०३ रुपये असेल. कमी झालेली किंमत आज रात्रीपासून लागू होणार आहे. गेल्या तीन वर्षांत देशात एलपीजी सिलेंडरच्या किमती दुपटीने वाढल्या असताना अनेक दिवसांपासून लोक घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत दिलासा मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. घरगुती सिलेंडरची किंमत सध्या मुंबईत ११०२.५० रुपये असून वरील घोषणेननंतर आता मुंबईकरांना घरगुती गॅस सिलेंडरसाठी एक हजार रुपयेहून कमी किंमत मोजावी लागेल.
पेट्रोल-डिझेलच्या दरातही दिलासा?
दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सरकार दिलासा देण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी चांगली कमाई केली असून करोनाच्या वेळी झालेले नुकसान आता भरून निघाले आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार वाहन इंधनाच्या दरातही मोठी कपात करू शकते.