एलन मस्क यांच्या कंपनीची आर्थिक नाडी भारतीयाच्या हाती; वैभव तनेजा ‘टेस्ला’चे नवे CFO
इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी अशलेल्या टेस्लाने भारतीय वंशाच्या व्यक्तीवर एक प्रमुख जबाबदारी सोपवली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांच्या मालकीच्या ‘टेस्ला’ने वैभव तनेजा यांची चीफ फायनॅनशिएल ऑफिसर म्हणजेच सीएफओ म्हणून नियुक्ती केली आहे. तनेजा हे त्यांच्या व्यवस्थापनाबरोबर योग्य आर्थिक नियोजनासाठी ओळखले जातात. वैभव तनेजा यांच्या नियुक्तीमुळे गुगलचे सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला यांच्या पंक्तीमध्ये आणखीन एका भारतीयाचा समावेश झाला आहे. वैभव तनेजांच्या हाती टेस्लासारख्या महत्त्वाच्या कंपनीची जबाबदारी आल्याने भारताचा शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. टेस्लाच्या या नव्या सीएफओंबद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात…
1) वैभव तनेजा यांनी 2017 साली टेस्ला कंपनी जॉइन केली. पहिल्या वर्षी ते कंपनीची उपकंपनी अशलेल्या सोलरसिटी कंपनीचे उपाध्यक्ष होते. त्यानंतर त्यांना कॉर्परेट कंट्रोलर म्हणून नियुक्त करण्यात आलं. टेस्लाने 2016 मध्ये या कंपनीचं अधिग्रहण केलं होतं. या दोन्ही कंपन्यांच्या अकाऊटिंग टीमचं इंटीग्रेशन करण्याचं काम वैभव यांनी यशस्वीपणे पार पाडलं.
2) वैभव तनेजा यांना जानेवारी 2021 मध्ये टेस्लाच्या भारतामधील टेस्ला इंडिया मोटर अॅण्ड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे निर्देशक म्हणून नियुक्त करण्यात आलं.
3) वैभव तनेजा यांच्याकडे अकाऊंटिंग क्षेत्रामधील 2 दशकांहून अधिक अनुभव आहे. तनेजा यांनी तंत्रज्ञान, फायनान्स, रिटेल आणि टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे.
4) टेस्लाचे माजी सीएफओ दीपक अहुजा आणि जॅचरी किरकोर्न यांच्याबरोबर तनेजा यांनी कंपनीचे तिमाही अहवाल आणि अन्य व्यवस्थापकीय निर्णयांबद्दल महत्त्वाचं योगदान यापूर्वी दिलं आहे.
5) वैभव तनेजा यांनी दिल्ली विद्यापिठामधून वाणिज्य शाखेतून पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. सुरुवातीला तनेजा यांनी प्राइझ वॉटर हाऊस कूपर्समधून आपली ओळख निर्माण केली. ते या कंपनीमध्ये 1996 साली रुजू झाले होते.
6) वैभव तनेजा हे भारतामधील या कंपनीच्या ऑफिसमध्ये काम केल्यानंतर अमेरिकेतील ऑफिसमध्ये नियुक्त झाले. त्यांनी या कंपनीमध्ये एकूण 17 वर्ष काम केलं.
भारतात टेस्लाचा कारखाना
दरम्यान, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी टेस्लाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर सरकारचं बोलणं सुरु असल्याचं सांगितलं आहे. या बैठकीमध्ये भारतात टेस्लाचा कारखाना सुरु करण्यासंदर्भातील चर्चा झाल्याचं समजतं. टेस्ला भारतामध्ये अमेरिकेपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक कार्सची निर्मिती करणार आहे. या कार्सची भारतामधील किंमत ही 24 हजार अमेरिकी डॉलर्सपर्यत असेल असं सांगितलं जात आहे. ही किंमत अमेरिकेतील किंमतीपेक्षा 25 टक्के कमी आहे.