देश

भाषणाची तयारी झाली, वडिलांना फोटोही पाठवला, शाळेत जाताच 15 वर्षांचा मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

तरुण वयात हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोवळ्या वयात हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्यूंमुळं चिंता वाढली आहे. गुजरातमध्येही एक मन सून्न करणारी घटना घडली आहे. 15 वर्षांच्या मुलाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. राजकोट जिल्ह्यातील गोंडल येथे असलेल्या स्वामी नारायण गुरुकुल या शाळेत हा मुलगा शिकत होता. (15 Years Old Boy Died Due To Heart Attack)

कार्यक्रम सुरू असतानाच खाली कोसळला
मुलाच्या शाळेत आज गुरुपौर्णिमेनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला जाण्याआधी त्याने वडिलांना त्याचा फोटोही काढून पाठवला होता. त्यावर त्याच्या वडिलांनी ऑल द बेस्टही लिहून पाठवले होते. मात्र कार्यक्रम सुरू असतानाच तो खाली कोसळला. विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कार्यक्रम थांबवण्यात आला. तसंच, विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
देवांश वेंकुभाई भयाणी (पटेल) असं मयत मुलाचे नाव आहे. देवांश दहावीच्या वर्गात शिकत होता. देवांश कार्यक्रमातच खाली कोसळल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्राथमिक तपासणी करायच्याआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर देवांशचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

एकुलता एक मुलगा
देवांशचे वडील हे उद्योजक असून तो एकुलता एक मुलगा होता. देवांश आज शाळेत गुरुपौर्णिमानिमित्त भाषण देणार होता. मात्र, जवळपास 8.30च्या दरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे.

वडिलांना फोटोही पाठवला
देवांशने गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त पूर्ण तयारी केली होती. कार्यक्रमाला निघण्याआधी त्याने देवांशने त्याचा एक फोटोही वडिलांना पाठवला होता. या फोटोवर त्याच्या वडिलांनी मोठ्या कौतुकाने ऑल द बेस्ट लिहलं होतं. मात्र, मुलासाठीचा हा त्याचा शेवटचा मेसेज ठरला. कार्यक्रमात भाषण करायच्या आधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर, एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Related Articles

Back to top button