शहरातील सदाशिव पेठेत पेरूगेट पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर मंगळवारी सकाळी एका तरुणीवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. दोन तरुणांनी मारेकरी तरुणाला अटकाव केल्याने तरुणी थोडक्यात बचावली. हा सर्व प्रकार घडला, त्या वेळी पोलिस चौकी बंद होती. त्यामुळे आता अखेर पेरूगेट पोलीस चौकीतील हवालदारासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करत निलंबन करण्यात आलं आहे.
पोलीस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांवर आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाबाबतचे आदेश परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्याकडून गुरुवारी रात्री देण्यात आले.
तरुणीवरील हल्ल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१) या आरोपीला अटक केली. परंतु पेरूगेट पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर हा सर्व थरार सुरू असताना, चौकीतील हे तीन पोलीस कर्मचारी कामाच्या ठिकाणावरून गैरहजर होते. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त गिल यांनी दिली.
पोलिसांना आदेश, मात्र तरीही पुन्हा तेच घडलं!
पोलिस चौक्यांमध्ये कर्मचारी उपस्थित असलेच पाहिजेत, असा स्पष्ट आदेश पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यानंतरही बुधवारी शहरातील काही पोलिस चौक्यांमध्ये शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले. स्वारगेट पोलिस ठाण्याच्या अखत्यारितील दोन्ही पोलिस चौक्यांत बुधवारी सकाळी कर्मचारी नव्हते. कात्रज पोलिस चौकीतही तेच चित्र होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने शहराच्या मध्यवस्तीतील पोलिस चौक्यांची पाहणी केली. त्यात पाच पोलिस चौक्यांत एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे धक्कादायक चित्र दिसून आले. त्याचे वृत्त प्रसिद्ध करून ‘महाराष्ट्र टाइम्स’ने या विषयाला वाचा फोडली. बुधवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पोलिस चौक्यांमध्ये कर्मचारी उपस्थित राहतील, यासाठी सूचना केली. त्यानुसार बऱ्याचशा चौक्यांमध्ये कर्मचारी उपस्थित होते. मात्र, स्वारगेट पोलिस ठाण्याच्या अखत्यारितील महर्षीनगर पोलिस चौकी, नेहरू स्टेडियम पोलिस चौकी आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या अखत्यारित असलेली कात्रज पोलिस चौकी या ठिकाणी कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले.
मेट्रोचे काम सुरू झाल्यापासून नेहरू स्टेडियम पोलिस चौकीतील कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून येते. या चौकीचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. सध्या ही चौकी स्वारगेट येथील पीएमपीच्या राजर्षी शाहू बस स्थानकाजवळ एका कंटेनरमध्ये कार्यान्वित असून, तेथे पीएमपी बसच्या रांगा आणि प्रवाशांची गर्दी असते. त्याचा पोलिसांच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
पोलिसांचे मनुष्यबळ वाढवण्याची गरज
शहराची लोकसंख्या गेल्या दशकात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, पोलिसांच्या मनुष्यबळात २००८पासून वाढ झाली नसून, ते अपुरे ठरत आहेत. साधारणपणे एक पोलिस चौकीच्या हद्दीत बीट मार्शल म्हणून दोन पोलिस कर्मचारी नेमलेले असतात. शहराच्या मध्यवर्ती भागात हे दोन मार्शल पुरेसे ठरू शकतात. मात्र, उपनगरात अंतर जास्त असल्याने मार्शलला वेळेत पोहोचणे शक्य होत नाही. नियंत्रण कक्षाकडून प्राप्त होणाऱ्या कॉलची संख्याही जास्त असते. त्यामुळे पोलिस मुख्यालय येथील राखीव मनुष्यबळातून पोलिस ठाण्यांना अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अशी भावना काही पोलिस कर्मचाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर व्यक्त केली.
दरम्यान, महर्षीनगर पोलिस चौकीत बुधवारी दुपारी साडेबारा ते पाऊणच्या सुमारास एकही पोलिस कर्मचारी नव्हता.









