जवळपास पाच ते सहा दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं धुमाकूळ घातल्यामुळं मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. पण, बळीराजा मात्र सुखावला. कोकणासह विदर्भात मागील काही दिवसांच्या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी शेतीच्या कामांना वेग आल्याचं पाहायला मिळालं. हाच पाऊस पुढील काही दिवसांसाठी सुरुच राहणार आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार बुधवारपासून रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबईसह नाशिक आणि सातारा या भागांमध्ये पावसाचा ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे. शिवाय पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागांना पाऊस झोडपणार आहे. सध्याच्या घडीला राजच्या अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावलेली असताना पांडुरंगाच्या पंढरीत मात्र हा वरुणराजा बरसलेला नाही. त्यामुळं आता आषाढीचा योग साधत तरी त्यानं हजेरी लावाली अशीच आस वारकरी लावून आहेत.
