खासदार प्रीतम मुंडेंचा भाजपला घरचा आहेर; कुस्तीपटूंची घेतली बाजू, कुस्तीगीरांशी संवाद साधायला कोणीच गेलं नाही, व्यक्त केली खंत
देशाला जागतिक स्तरावर पदकं मिळवून देणाऱ्या कुस्तीपटूंनी सध्या देशातील व्यवस्थेविरोधातच बंड पुकारल्याचं दिसतंय. कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. याच प्रकरणावरुन आता महाराष्ट्रातील भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे (BJP MP Pritam Munde) यांनी स्वतःच्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. तसेच, यासंदर्भात बोलताना सरकारकडून कुस्तीगीरांशी संवाद साधायला कोणीच गेले नसल्याची भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी खंत व्यक्त केली आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी आंदोलन छेडलं आहे. भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देऊन कुस्तीपटूंना समर्थन दिलं आहे. खेळाडूंच्या तक्रारीची दखल घेतली जात नसेल तर लोकशाहीत ते स्वागतार्ह नाही असं मुंडे म्हणाल्या. खेळाडूंच्या बाजूनं बोलणाऱ्या प्रीतम मुंडे या भाजपमधल्या पहिल्याच नेत्या आहेत. आतापर्यंत कुणाही मंत्र्यानं किंवा खासदारानं आंदोलक कुस्तीपटूंना पाठिबा दर्शवलेला नाही.
प्रीतम मुंडेंचा भाजपला घरचा आहेर
देशभर गाजत असलेल्या महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या विषयात भाजपच्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी मोदी सरकारला घराचा आहेर दिला आहे. या प्रकरणात त्या खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणी गेले नाही, ही खेदाची बाब आहे. सरकारनं खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता, अशी स्पष्ट भूमिका प्रितम मुंडे यांनी घेतली आहे.
बीड शहरात आयोजित पत्रकार परिषदेत प्रीतम मुंडे बोलत होत्या. महिला खेळाडूंशी संबंधित प्रश्नावर बोलताना खासदार मुंडे यांनी “केवळ खासदारच नाही तर एक महिला म्हणूनही मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. असे आरोप जेव्हा होतात, तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती, यातील सत्य समोर यायला हवं होतं. सरकारकडून त्या महिला खेळाडूंशी संवाद साधायला कोणीच गेलं नाही. ते व्हायला हवं होतं. या प्रकरणात योग्य ती कारवाई व्हायला हवी.”, असं खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या.
फक्त सहा हजार रुपये शेतकऱ्याला देणं हा सन्मान नाही : प्रीतम मुंडे
6000 रुपये देणं हा शेतकऱ्यांचा सन्मान नाही ही संकल्पना चुकीची आहे, असं म्हणत खासदार प्रीतम मुंडे यांनी सरकारच्या सन्मान योजनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. आज पिकाची जी अवस्था आहे ती मनुष्याच्या हातातली नाही, मानव नवनिर्मित नाही, निसर्गामुळे होणाऱ्या आपत्तीमुळे जागतिक मार्केटवर परिणाम होतो. त्यामुळे शेतीमालाचा भाव घसरतोय. यात दोष फक्त भारत सरकारचा नाही, जे शेतकरी थकलेले आहेत, त्यांच्यासाठी ही योजना आहे. फक्त शेतकऱ्यांना सन्मान देण्यासाठी आम्ही काम केलं, त्यांचा सन्मान व्हावा 6000 घ्या आणि गपचूप बसा, असा त्यांचा अर्थ होत नाही, असं म्हणत आपली चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर सारवा सरव देखील केली.